ऑक्टोबरच्या मध्यावर, भर दुपारी, मिझोरममधल्या मुइफंगच्या डोंगर-माथ्यावरील ढगांनी आच्छादलेल्या जंगलात सूर्याची किरणं झिरपत खाली येताहेत. तरीही हिरव्या गर्द वनराजीत वातावरण थंडगार आणि अंधारलेलं आहे. एक प्रसन्न शांतता त्या जंगलात सर्वत्र व्यापून राहिली आहे - केवळ पक्ष्याचे मंजुळ आवाज आणि लाकूड तोडतानाचा तालबद्ध थ्वॅक थ्वॅक एवढाच काय तो आवाज ऐकू येतोय.
६५ वर्षांच्या झुइलियानी कमरेत ओणवं होऊन पूर्णपणे मग्न होऊन काम करत होत्या. जवळच सरपणाची छोटी रास होती. या आहेत मुइफुंगच्या लालझुइलियानी. आपल्या घरासाठी लाकूड गोळा करण्याच्या कामात व्यस्त. त्यांना सगळे झुइलियानी म्हणतात. त्यांच्या पायाजवळ कुऱ्हाडीसारखं एक हत्यार आहे. त्याचं पाचराच्या आकारासारखं जड पातं एका लांब दांड्यात बसवलंय, वापरून वापरून हा दांडा गुळगुळीत झालेला दिसतोय. झुइलियानी या कुऱ्हाडीने बाटलांगकेन झाडाच्या (क्रॉटॉन लिसोफायलस) ओंडक्यांचे सपासप तीन ते साडेचार फूट लांबीचे फाटे करत होत्या. लाकडं अजूनही ओली आहेत. हा गोळा केलेला लाकूडफाटा जवळजवळ ३० किलोग्रॅम भरेल.
घरी नेण्यासाठी लाकडं फोडत असताना त्यांचे हात असे झपाझप चालतात की त्यांच्या हातातला दाऊ (कोयता) जणू दिसेनासा होतो. त्यांच्या हालचालींमधली सफाई केवळ वर्षानुवर्षांच्या रोजच्या सवयीतून आलेली आहे हे निश्चित.











