‘पारी’च्या ‘जात्यावरील ओव्या’ या प्रकल्पातील पुढच्या २३ ओव्या पुणे जिल्ह्यातील राजमाची गावातल्या रेणुका उंबरेने गायल्या आहेत. एका स्त्रीचं वाढत चाललेलं दुखणं आणि त्यात तिचा अंत आणि या सगळ्या काळात तिची भावंडं आणि आईवडील यांच्या शोकाने तिच्या हळव्या मनाला मिळणारे समाधान याबद्दलच्या या ओव्या आहेत.
“मी फक्त जात्यावरच्या ओव्या आणि सणाची गाणी म्हणते.”, रेणुकाने या प्रकल्पाच्या मूळ गटाला १९९७मध्ये सांगितलं. ‘पण तेही काही वर्षांपासून कमी होतंय’, तिने सांगितलं. ‘आताशा टूरिस्ट येतात’, गावात राहायला येणाऱ्या प्रवाशांबद्दल ती सांगत होती, ‘आम्हाला त्यांचा पाहुणचार करावा लागतो त्यामुळे गायला वेळ मिळत नाही. मला आता बऱ्याच ओव्या आठवतही नाहीत पण मला त्या गाऊन मन मोकळं करायला आवडतं.’
वीस वर्षांपूर्वी जेव्हां या प्रकल्पाची मूळ टीम तिला भेटली तेव्हा पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील राजमाची गावातल्या डोंगराच्या पायथ्याशी रेणुका राहत होती. तिचं कुटुंब दुसऱ्याच्या शेतात नागली पिकवत असे. नुकतीच त्यांनी रायगड जिल्ह्यात थोडी जमीन घेऊन भातशेती सुरु केली होती. ते कधी कधी एका आठवड्यासाठी किंवा दिवसभरासाठी तिथे जात. त्या शेतात पोचायला त्यांना एक डोंगर पायी पार करावा लागे.
रेणुकाचा आवाज फार सुरेल/गोड होता. तिला अनेक ओव्या पाठ होत्या; ती त्या लहानपणी आपल्या आईकडून आणि पुढे आपल्या आते-मावस सासूकडून शिकली होती. रेणुका सांगत होती की ओव्या गाताना बाया साधारणपणे वरचा सूर लावत नाहीत कारण दळता दळता तसं गायलं तर थकायला होतं. इतर पट्टीत ओव्या गाणाऱ्या बायांसारखीच रेणुका एक विषय सुरु केला की निदान दहा ओव्या त्याच्याच गाते.
रेणुका सांगते की ती भजनं किंवा गौळणी गात नाही. (राजमाचीतही पाण्याचे नळ नाहीत त्यामुळे नदीवर पाण्याला जावं लागे आणि तेव्हा बाया गौळणी गात)
रेणुकाने त्यावेळी गायलेल्या ओव्या पारीच्या मंचावर प्रथम ‘जात्यावरील ओव्या’ प्रकल्पाच्या २९ मार्च २०१७च्या आवृत्तीत प्रसिद्ध झाल्या आहेत.
इथे प्रसिद्ध केलेल्या ध्वनिमुद्रणात २३ ओव्यांत एका स्त्रीची कहाणी आहे. एका सध्या डोकेदुखीतून तिला मोठा आजार होतो आणि त्यातच ती मृत्युमुखी पडते. प्रत्येक ओवी तिचं तिच्या बहिणी-भाऊ आणि आई-वडिलांबद्दलचं प्रेम दर्शवते; त्यांनाही तिच्याबद्दल असाच जिव्हाळा असावा अशी अपेक्षाही त्यांतून दिसते.





