“मी काठी मारली तरी त्याने माझ्यावर उडी घेतली, माझ्या मानेवर आणि हातावर पंजा मारला. मी जंगलात आतमध्ये चार किलोमीटरवर होतो. सगळे कपडे रक्ताने भरले होते. कसाबसा मी घरी चालत आलो.” बिबट्याच्या हल्ल्यातून वाचलेले विशालराम मरकाम पुढचे दोन आठवडे हॉस्पिटलमध्ये होते. आपल्या म्हशींना काही झालं नाही याचाच त्यांना आनंद होता. “बिबट्याने माझ्या कुत्र्यांवरही हल्ला केला. ती पळून गेली,” ते सांगतात.
२०१५ सालची ही घटना. मरकाम आता तो प्रकार हसण्यावारी नेतात कारण त्या हल्ल्याच्या आधी आणि नंतरही शिकारी जनावरं त्यांनी अगदी जवळून पाहिली आहेत, ते म्हणतात. छत्तीसगडच्या जबर्राच्या जंगलात ते आपल्या म्हशी चारतात आणि तिथे फक्त भक्ष्याच्या शोधातले बिबटेच नाही तर वाघ, कोल्हे, लांडगे, रानकुत्री, रानडुकरं आणि सोबत सांबर, चितळं आणि गवेसुद्धा फिरत असतात. उन्हाळ्यात आटत चाललेल्या पाण्याच्या शोधात जेव्हा जनावरं मोजक्या पाणवठ्यांवर जातात तेव्हा तर या प्राण्याचं दर्शन होण्याची शक्यता दुपटीने काय तिपटीने वाढते.
“माझ्या म्हशी स्वतःच्या मनाने जंगलात मनमुक्त फिरत असतात. त्या परत आल्या नाहीत तरच मी त्यांना शोधायला जंगलात जातो,” मरकाम सांगतात. “कधी कधी जनावरं पहाटे ४ वाजेपर्यंत परत येत नाहीत. मग रात्रीच्या अंधारात जंगलात त्यांना शोधण्यासाठी डबल [पॉवरचा] टॉर्च वापरायला लागतो.” ते आम्हाला त्यांचे तळवे आणि पाय दाखवतात. अनवाणी जंगलात फिरल्याने त्यांचे पाय जखमा आणि वणांनी भरलेले आहेत.
धमतरी जिल्ह्याच्या नगरी तहसिलातल्या जबर्रा गावाच्या जवळ जंगल आहे. आणि याच जंगलात ९-१० किलोमीटर आतपर्यंत या मनस्वी म्हशी गवताच्या शोधात चरत, हिंडत असतात. “उन्हाळ्यात त्या याच्या दुप्पट अंतर फिरत असतील. गवतच नसतं. आणि चाऱ्यासाठी आता केवळ जंगलावर अवलंबून राहणं शक्य नाही. जनावरं भुकेने मरून जायची,” मरकाम सांगतात.









