या कच्च्या पायवाटा कित्येक किलोमीटर पसरल्या आहेत. या वाटेने सौरामधील रुग्णालयापर्यंतचा प्रवास म्हणजे दरवेळी युद्धाचा प्रसंग. मुबिना आणि अर्शिद हुसैन अखून यांना आपला मुलगा मोहसीन याच्या वैद्यकीय तपासणीसाठी महिन्यातून किमान एकदा तरी रुग्णालयात जावं लागतं. अर्शिद आपल्या नऊ वर्षांच्या मुलाला कडेवर घेऊन राख-ए-अर्थ पुनर्वसन वसाहतीतील सांडपाणी आणि वितळत्या बर्फाने ओसंडून वाहणाऱ्या वाटा तुडवतात.
२-३ किलोमीटर पायपीट केल्यावर त्यांना सहसा ऑटोरिक्षा मिळतो. तो रू. ५०० सवारीने त्यांना अंदाजे १० किमी लांब असलेल्या उत्तर श्रीनगरच्या सौरा वस्तीतील शेर-ई-काश्मीर वैद्यकीय विज्ञान संस्थानात नेऊन परत आणतो. कधीकधी या कुटुंबाला रूग्णालयापर्यंतचं अख्खं अंतर पायी चालत जावं लागतं – खासकरून मागील वर्षीच्या टाळेबंदी दरम्यान त्यांच्यावर ही वेळ आली होती. "अख्खा दिवस निघून जातो," मुबिना म्हणते.
सुमारे नऊ वर्षांपूर्वी मुबिना आणि अर्शिद यांचं जगच बदलून गेलं. २०१२ मध्ये मोहसीन जेमतेम काही दिवसांचा होता तेव्हा त्याला ताप आला आणि कावीळ झाली, आणि त्याच्या शरीरातील बिलीरुबिनची पातळी प्रचंड वाढली. नंतर लागोपाठ डॉक्टरांच्या वाऱ्या झाल्या. दोन महिने तो श्रीनगरमधील शासकीय जी. बी. पंत बाल रुग्णालयात होता. अखेर त्यांना कळवण्यात आलं की त्यांचा मुलगा 'ॲबनॉर्मल' आहे.
"त्याच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हती तेव्हा त्याला आम्ही एका खासगी डॉक्टरकडे घेऊन गेलो ज्यांनी आम्हाला सांगितलं की त्याचा मेंदू पूर्णपणे खराब झाला असून त्याला कधीच उठता-बसता येणार नाही," तिशितली मुबिना आठवून सांगते.
कालांतराने मोहसीनला सेरेब्रल पाल्सी असल्याचं निदान झालं. तेव्हापासून मुबिनाचा बहुतांश वेळ आपल्या मुलाची देखरेख आणि आजारपण करण्यात जातो. "मला त्याची लघवी साफ करावी लागते, त्याची गादी, कपडे धुवावे लागतात आणि त्याला बसवावं लागतं. तो दिवसभर माझ्या मांडीत बसून राहतो," ती म्हणते.










