दिवस छान वर आलाय, ३९ वर्षीय सुनीता रानी ३० जणींच्या एका समूहाशी बोलतायत. सगळ्यांनी बाहेर पडून स्वतःच्या हक्कांसाठी बेमुदत धरणं धरायला पाहिजे असं त्यांचं आवाहन आहे. “काम पक्का, नौकरी कच्ची,” सुनीता घोषणा देतात, “नही चलेगी, नही चलेगी!” इतर सगळ्या एका सुरात म्हणतात.
दिल्ली हरयाणा महामार्गावरच्या सोनिपत गावातल्या जिल्हा रुग्णालयाबाहेरच्या गवतावर लाल रंगाच्या विविध छटांचे कपडे – हरयाणात हा त्यांचा गणवेश आहे – परिधान केलेल्या या कार्यकर्त्या सतरंजीवर बसून सुनीतांचं बोलणं ऐकत होत्या. त्यांच्याच समस्यांचा पाढा तिच्या तोंडून ऐकत होत्या.
या सगळ्या जणी आशा आहेत. देशाच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचं हे पायदळ. ग्रामीण भारतातली जनता आणि सार्वजनिक आरोग्य सेवांमधला कळीचा दुवा. देशभरात मिळून सुमारे १० लाख आशा काम करतायत आणि आरोग्यासंबंधी काही लागलं किंवा आणीबाणी आली तर लगोलग भेटणारी आरोग्य सेवक म्हणजे आशाच आहेत.
त्यांच्या १२ प्राथमिक जबाबदाऱ्या आणि ६० हून अधिक उपक्रम पाहिले तर चक्रावून जायला होतं. पोषण, स्वच्छता आणि संसर्गजन्य आजारांसंबंधी माहिती देण्यापासून ते क्षयाचे रुग्ण शोधणं, त्यांच्यावर देखरेख आणि आरोग्यासंबंधी निर्देशांकांची माहिती नोंदवून ठेवणे अशी विविध कामं त्या करतात.
हे सगळं करतानाच त्या इतरही अनेक गोष्टी करतात. पण, सुनीता सांगतात, “या सगळ्यातून जे करायचं राहून जातं ना ते म्हणजे माता आणि नवजात बालकांच्या आरोग्यामध्ये सुधारणा. ज्यासाठी आम्हाला प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे.” सुनीता सोनिपत जिल्ह्याच्या नाथूपूर गावात काम करतात आणि त्या गावातल्या २,९५३ लोकसंख्येला सेवा देणाऱ्या तीन आशांपैकी एक आहेत.








