किशोरावस्थेत दिवस जाऊ देऊ नका हे नुसरत बन्नोंनी अनेकींना पटवून दिलंय, गर्भनिरोधन करू द्यावं म्हणून त्यांच्या सासरच्यांशी भांडण केलंय आणि बायांना बाळंतपणांसाठी ती दवाखान्यात घेऊन गेलीये. पण बिहारच्य अरारिया जिल्ह्यातल्या या ३५ वर्षीय आशा कार्यकर्तीसाठी सगळ्यात कठीण काय असेल तर नसबंदी करून घेण्यासाठी पुरुषांचं मन वळवणं.
“गेल्या वर्षी [२०१८] एकच जण तयार झाला,” फोर्ब्सगंज तालुक्यातल्या सुमारे ३,४०० लोकसंख्येच्या गावातली ही गत ती सांगते. “आणि नसबंदी करून घेतल्यानंतर त्याची बायको मला चक्क चपलेने मारायला आली,” ही चार लेकरांची आई मला हसत हसत सांगते.
रामपूरमध्ये जी नकारघंटा दिसते तीच बिहारच्या इतर गावांमध्येही दिसते. “त्यांच्या मनातली सगळ्यात मोठी भीती म्हणजे इतर पुरुष त्यांची चेष्टा करतील आणि त्यांना हसतील,” गेल्या वर्षी विनय कुमार यांनी मला सांगितल्याचं आठवतं. बिहारमध्ये दर वर्षी नोव्हेंबर महिन्यात पुरुष नसबंदी सप्ताह घेतला जातो. आणि त्याची माहिती करून देण्यासाठी आणखी एका टप्प्याची त्यांची तयारी सुरू होती. “आपण कमजोर होऊ आणि लैंगिक संबंध करू शकणार नाही असंही त्यांना वाटत असतं, हे सगळे गैरसमज आहेत.”
३८ वर्षीय कुमार यांनी गेलं वर्षभर जेहानाबाद जिल्ह्याच्या मखदमपूर तालुक्यातल्या ३,४०० लोकसंख्येच्या बिर्रा गावामध्ये विकास मित्र म्हणून काम केलं आहे. त्यांचं काम म्हणजे शासनाच्या वेगवेगळ्या योजनांबद्दल जगजागृती आणि अंमलबजावणी करणे. आणि याचाच एक भाग म्हणजे नसबंदी करून घ्यावी म्हणून त्यांचं मन वळवणं – आणि हे काम कुणीच फार खुशीनं करणार नाही. पुरुष नसबंदी म्हणजे वृषणांमधल्या बारीक पुरुषबीजवाहिन्यांना छेद देऊन त्यांची टोकं बांधली जातात.
बिहारमध्ये पुरुष नसबंदीचं आधीच अत्यंत कमी असणारं ०.६ टक्के हे प्रमाण (एनएफएचएस – ३ – २००५-०६) घसरून ० टक्के झालंय (एनएपएचएस – ४, २०१५-१६). याच काळात १५ ते ४९ वयोगटातल्या सध्या विवाहित असणाऱ्या महिलांमधील नसबंदीचं प्रमाणही २३.८ टक्क्यांवरून २०.७ टक्के इतकं खालावलंय – तरीही ते पुरुष नसबंदीपेक्षा जास्तच आहे.
बिहारमधलं चित्र हे अख्ख्या देशाचं प्रातिनिधीक चित्र आहेः एनएफएचएस – ४ च्या अहवालानुसार, संपूर्ण भारतात सध्या विवाहित असणाऱ्या महिलांपैकी (१५-४९ वयोगट) ३६ टक्के स्त्रियांची नसबंदी झाली असून या स्त्रियांपैकी केवळ ०.३ टक्के स्त्रियांनी पुरुषांची नसबंदी झाल्याचं सांगितलं आहे.
देशात निरोधचा वापरही लक्षणीयरित्या कमी आहे – १५ ते ४९ वयोगटातील सध्या विवाहित असणाऱ्या बायांपैकी केवळ ५.६ टक्के स्त्रियांनी गर्भनिरोधक म्हणून निरोधचा वापर करत असल्याचं सांगितलं आहे.








