“आम्हाला तुमचा नंबर गांधीच्या डायरीत मिळाला. हायवेवर त्यांना कोणत्या तरी गाडीने उडवलं आणि त्यातच ते मरण पावले,” रविवारी, ९ डिसेंबर रोजी रात्री साधारण ७.३० वाजता रेशन दुकानाचे मालक आणि राजकीय कार्यकर्ते असणाऱ्या बी. कृष्णय्या यांनी मला फोनवर ही बातमी दिली.
मी गंगप्पांना – किंवा ‘गांधीं’ना – शेवटचा भेटलो ते २४ नोव्हेंबर रोजी बंगलोर-हैद्राबाद हायवेवर. सकाळचे १०.३० वाजले असावेत. ते गांधींच्या वेशात अनंतपूरला निघाले होते. अनंतपूरहून ८ किलोमीटरवर असणाऱ्या रापताडू गावातल्या एका खानावळीत ते राहत होते. “दोन महिन्यांपूर्वी कुणी तरी मला सांगितलं की एका म्हाताऱ्या माणसाला रहायला जागा हवी आहे म्हणून मी त्यांना इथे राहण्याची परवानगी दिली. मी कधी कधी त्यांना खायलाही द्यायचो,” खानावळीचे मालक, वेंकटरामी रेड्डी सांगतात. मला ज्यांनी फोन केला ते कृष्णय्या कायम इथे चहा प्यायला यायचे आणि गंगप्पांशी गप्पाही मारायचे.
मी मे २०१७ मध्ये पारीसाठी गंगप्पांची गोष्ट लिहिली होती. तेव्हा त्यांचं वय सुमारे ८३ वर्षं होतं. सत्तर वर्षं शेतात मजुरी केल्यानंतर, वयाच्या ८३ व्या वर्षी गंगप्पांनी स्वतःला महात्मा गांधींचं रुप दिलं होतं. ऑगस्ट २०१६ पासून ते गांधींचं सोंग घेऊन पश्चिम आंध्र प्रदेशातल्या अनंतपूर शहरात वेगवेगळ्या सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावत असत. शेतात मजुरी मिळायची त्यापेक्षा यातून मिळणारी भीक जास्तच होती.
२०१६ साली रानात काम करताना भोवळ येऊन पडल्यापासून गंगप्पांनी ते काम सोडलं होतं. काही काळ त्यांनी दोर वळले मात्र म्हाताऱ्या माणसाच्या हाताला कितीसं काम होणार. तेव्हाच त्यांनी गांधींचं सोंग घ्यायचा निर्णय घेतला.
गंगप्पांनी रोजच्या वापरातल्या साध्या साध्या गोष्टींमधून गांधीचां वेश तयार केला होता. महात्मा गांधींचं ‘तेज’ येण्यासाठी ते १० रुपयाची पॉण्ड्स पावडर वापरायचे. रस्त्यावरच्या टपरीतला स्वस्तातला चष्मा, गांधींचा चष्मा बनायचा. गावातल्या बाजारातली १० रुपयाची साधी काठी गांधीजींची काठी व्हायची. कुठे तरी सापडलेला मोटरसायकलचा आरसा आपला वेश आणि रंगरंगोटी ठीक आहे ना पाहण्यासाठी कामी यायचा.


