पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या भाषणात त्यांनी आपल्याला थाळ्या-टाळ्या वाजवून दुष्टात्म्यांना दहशत बसवून पिटाळून लावायला सांगितलं.
आणि त्यांच्या दुसऱ्या भाषणानं मात्र वाचा वळली ती आपली.
येत्या काही आठवडयांमध्ये, लोकांना, खास करून गरिबांना अन्न आणि इतर अत्यावश्यक सेवा कशा मिळणार आहेत याबद्दल एक अवाक्षरही त्यांनी आपल्या भाषणात काढलं नाही. आणि मग अर्थातच जो काही भीतीचा आगडोंब उसळणार होता तो उसळलाच. मध्यमवर्गीयांनी दुकानं आणि बाजारात गर्दी केली – गरिबांना काही दर वेळी हे शक्य नसतं. शहरं सोडून गावी परतणाऱ्या स्थलांतरितांनाही नाही आणि छोटे विक्रेते, घरकामगार आणि शेतमजुरांनाही नाही. रबीच्या पिकांची सगळी उस्तवार अजून पूर्ण झाली नाही किंवा माल घरात येऊन पडलाय अशा शेतकऱ्यांनाही हे शक्य होतंच असं नाही. भारतातल्या परिघावर जगणाऱ्या लाखो-करोडो वंचितांसाठी ही सहज गोष्ट नाहीये.
२६ मार्च रोजी अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये बुडत्याला काडीचा आधार अशी एक घोषणा करण्यात आली – सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे देण्यात येणाऱ्या धान्याव्यतिरिक्त प्रत्येक व्यक्तीला पुढचे तीन महिने ५ किलो गहू किंवा तांदूळ मोफत देण्यात येणार आहेत. आता त्यातही हे स्पष्ट नाही की आता जाहीर झालेले ५ किलो मोफत मिळणार का आधीच रेशनवर मिळतात ते. जर कोणत्याही धान्यासाठी पैसा द्यावा लागणार असेल तर ही योजना कुचकामी ठरणार हे निश्चित. या पॅकेजमध्ये जाहीर करण्यात आलेल्या बहुतेक गोष्टी म्हणजे सध्या अस्तित्वात असणाऱ्या योजनांसाठीच निधी जाहीर करण्याचा प्रकार आहे. मनरेगाच्या मजुरीत २० रुपयांची वाढ व्हावी ही जुनीच मागणी आहे. जादा दिवसांचा मात्र उल्लेखही का नसावा? आणि आता लगेच याची अंमलबजावणी कशी करण्यात येणार आहे? काय प्रकारचं काम काढलं जाईल आणि त्यामध्ये ‘सामाजिक अंतर’ कसं बरं राखलं जाणार आहे? ही कामं करण्याइतकी शक्ती तरी लोकांमध्ये राहणार आहे का? जोपर्यंत हे संकट सुरू आहे तोपर्यंत प्रत्येक मजूर आणि शेतकऱ्याला मनरेगाचा भत्ता रोजचा रोज दिला गेला पाहिजे, मग काम असो अथवा नसो.
पीएम-किसानमधून देण्यात येणारे २००० रुपये तसेही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणारच होते – त्यात नवीन काय दिलंय? तिमाहीच्या शेवटच्या महिन्याऐवजी पहिल्या महिन्यात पैसे वितरित करण्यात येतील एवढंच. ही साथ आणि संचारबंदीचा मुकाबला करत असताना अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या १ लाख ७० हजार कोटींची विभागणी कशी करण्यात येणार आहे याचा कुठेही उल्लेख केलेला नाही. यातल्या नवीन घोषणा कोणत्या आहेत? का आधीच्याच योजनांचे आकडे इथून तिथून जोडून नवे म्हणून मांडले गेले आहेत? तसं असेल तर मग ते काही आणीबाणीच्या वेळेत जाहीर केलेले उपाय म्हणून गणता येणार नाहीत हे नक्की. शिवाय, पेन्शनधारक, विधवा आणि अपंगत्व असणाऱ्यांना एक रकमी रु. १००० दोन हप्त्यात पुढच्या तीन महिन्यांसाठी देण्यात येणार? आणि जन धन योजनेखाली पुढचे तीन महिने २० कोटी स्त्रियांच्या खात्यात प्रत्येकी ५०० रुपये जमा केले जाणार? हे म्हणडे तोंडाला पानं पुसणं देखील नाही, ही चक्क क्रूर चेष्टा आहे.
बचत गटांना सध्या मिळू शकणारं कर्ज घ्यायलाच जिथे नाकी नऊ येतायत तिथे कर्जाची मर्यादा वाढवून नक्की काय फायदा होणार आहे? आणि जे असंख्य स्थलांतरित कामगार घरापासून दूर अडकून पडलेत, ज्यांना आपापल्या घरी परतायचंय त्यांना या सगळ्या घोषणांचा काय आणि कसा फायदा होणार आहे? या सगळ्या उपायांचा स्थलांतरितांना फायदा होणार आहे हा दावा पूर्णपणे निष्फळ आहे. तातडीने काही उपाययोजना गांभीर्याने लागू करण्यात तर अपयश आलेलंच आहे पण त्याहूनही गंभीर बाब म्हणजे या पॅकेजमागचा एकूण विचारच अधिक चिंताजनक आहे. जमिनीवर, प्रत्यक्षात काय घडतंय याची त्यांना कसलीही जाणीव-खबर नाही हेच त्यातून प्रतीत होतंय.






