एका दुपारी, बागलकोट-बेळगाव रस्त्यावर एस. बंदेप्पा आपला मेंढ्यांचा कळप घेऊन चालला होता तेव्हा माझी त्याची भेट झाली. आपल्या मेंढ्या शेतात बसवण्यासाठी तो एखाद्या शेतकऱ्याची जमीन शोधात होता. “मेंढ्यांच्या लेंडीची चांगली किंमत देणारे शेतमालक आम्ही शोधतो,” तो म्हणाला. ते हिवाळ्याचे दिवस होते, कुरुबा मेंढपाळ साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये चारणीला बाहेर पडतात; तेव्हा शेताची कामंही तुरळकच असतात.
तेव्हापासून मार्च-एप्रिल पर्यंत, अनुसूचित जमातीत गणले जाणारे कर्नाटकातील हे कुरुबा दोन-तीन कुटुंबांच्या गटात भटकंतीला बाहेर पडतात. साधारणपणे त्यांच्या नेहमीच्या वाटेने ते ६०० ते ८०० मैलांचा प्रवास करतात. त्यांची मेंढरं आणि शेरडं पडक रानात चरतात आणि त्यांच्या प्राण्यांच्या लेंड्यांच्या खताचा शेतकऱ्याकडून त्यांना मोबदला मिळतो. ‘चांगल्या’ जमीनमालकाकडून बंदेप्पाला काही दिवसांच्या एका थांब्याचे हजारेक रुपये मिळतात. मग तो पुढच्या थांब्याकडे निघतो, आणि वाटेवर जवळपासच्या इतर शेतकऱ्यांसोबत नवीन चांगला सौदा होईल का हे बघतो. पूर्वी त्याला धान्य, गूळ आणि कपडेदेखील मिळत पण आता शेतकऱ्यासोबत असा सौदा करणं कठीण होत चाललंय असं तो सांगतो.
“(हल्ली) जमीनमालकाच्या शेतात मुलाबाळांना घेऊन राहणं सोपं नाही,” निलाप्पा चचडी म्हणतात. बेळगाव (आता बेळगावी) जिल्ह्याच्या बैलहोंगल तालुक्यातील बैलहोंगल-मुनवल्ली रस्त्यावर माझी त्यांची भेट झाली तेव्हा ते मेंढ्यांना रोखण्यासाठी शेताभोवती दोर बांधीत होते.
पण मेंढपाळ कुरुबांच्या पुढ्यात एवढा एकच बदल नाहीये. गेल्या २० वर्षांत, त्यांच्या दक्खनी जातीच्या मेंढ्यांच्या लोकरीला असणारी मागणी कमी होत चाललीये. या मेंढ्या इथलं कोरडे हवामान सहन करू शकतात. पूर्वापारपासून, कुरुबांच्या उत्पन्नाचा मोठा भाग कांबळी (घोंगडी किंवा आंध्रात म्हणतात गोंगली) बनवण्यासाठी होणाऱ्या लोकरीच्या विक्रीपासून येत होता. मेंढ्यांच्या लेंडीखतापासून मिळणाऱ्या पैशाचा हातभार लागे. ही लोकर जवळच मिळत असे, स्वस्त असे आणि तिला मागणीही खूप असे.
बेळगावी जिल्ह्याच्या रामदुर्ग तालुक्यातील दडीभावी सालापूर गावातील विणकर हे प्रामुख्याने त्यांचे खरेदीदार होते. त्यांपैकी बहुतेक कुरुबा जमातीच्या पोटजातीतीलच आहेत. (काही कुरुबा गावामध्ये कायमस्वरुपी घरं बांधून स्थाईक झालेले आहेत. त्यांच्या पोटजाती आहेत, मेंढपाळ, विणकर, शेतकरी इ.) पूर्वी त्यांनी विणलेली कांबळी सैन्यदलात लोकप्रिय होती पण आता त्यांना फारशी मागणी नाही. “आता ते (जवान) स्लीपिंग बॅग्ज वापरतात,” एक विणकर पी. ईश्वरप्पा सांगतात. दडीभावी सालापूर मध्ये त्यांचा एक खड्ड्यातील हातमाग (डबऱ्या माग) आहे आणि त्यावर ते आजही काळ्या घोंगड्या विणतात.
दडीभावी सालापूर पासून दोनशे किमी. अंतरावरच्या रानेबेन्नुर (जि. हावेरी) येथील एका दुकानाचे मालक दिनेश शेठ म्हणतात, “दक्खनी कांबळ्यांची मागणी कमी होण्याचं एक कारण म्हणजे मिश्र कृत्रिम धाग्यांची आणि इतरही प्रकारची स्वस्त पांघरुणं उपलब्ध आहेत.”






















