सन २०२१ च्या उन्हाळ्यातल्या त्या सकाळी मीनू सरदार पाणी भरायला बाहेर पडली तेव्हा इतकं भयंकर काही घडेल, हे तिच्या ध्यानीमनीही नव्हतं. जेमतेम बावीस वर्षांच्या आणि गेली तीन-चार वर्षं आरोग्याच्या अनेक समस्यांनी गांजून गेलेल्या दयापूर गावातल्या मीनूचं खरं तर हे रोजचंच काम होतं. तळ्याकडे जाणार्या पायर्या अनेक ठिकाणी तुटलेल्या होत्या. मीनूचा त्यावरून पाय घसरला आणि ती गडगडत खाली आली, तोंडावर पडली.
‘‘माझ्या छातीत आणि पोटात प्रचंड वेदना व्हायला लागल्या,’’ ती बंगालीत सांगते. ‘‘योनीतून रक्तस्राव व्हायला लागला. बाथरूमला गेले तर योनीतून काहीतरी बाहेर आलं आणि लादीवर पडलं. मांसाच्या गोळ्यासारखं काहीतरी आतून बाहेर येतंय हे मला कळत होतं. मी बाहेर खेचायचा प्रयत्न केला, पण नाही जमलं मला ते.’’
जवळच्या गावातल्या एका खाजगी दवाखान्यात तिला नेण्यात आलं आणि तिथल्या डॉक्टरनी तिचा गर्भपात झाला आहे, यावर शिक्कामोर्तब केलं. उंच, सडसडीत, सगळ्या चिंता बाजूला ठेवत सतत हसतमुख असणार्या मीनूची पाळी तेव्हापासून अनियमित झाली आहे. सोबत प्रचंड शारीरिक वेदना आणि मानसिक त्रास आहेच.
पश्चिम बंगालमधल्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातल्या गोसाबा तालुक्यातल्या मीनूच्या गावाची लोकसंख्या आहे जवळपास पाच हजार. डोलणारी हिरवीगार शेतं आणि सुंदरबनातलं खारफुटीचं जंगल... गोसाबा तालुक्यातल्या रस्त्याने जोडल्या गेलेल्या मोजक्याच गावांमधलं हे एक गाव, दयापूर.
त्या दिवशी पडल्यामुळे गर्भपात झाल्यावर मीनूला महिन्याभर सतत रक्तस्राव होत होता. हे एवढंच नव्हतं. ‘‘शारीरिक शोम्पोर्के एतो ब्यथा कोरे’’ (शरीरसंबंधांच्या वेळीही प्रचंड वेदना होतात), ती सांगते. ‘‘कुणीतरी फाडून तुकडे तुकडे करतंय माझे, असं वाटतं मला. संडासला गेल्यावर थोडा जोर लावला किंवा जड काही उचललं तर आपलं गर्भाशयच खाली येतंय, असं वाटतं.’’











