वेनमनी गावातल्या कीळवेनमनी वस्तीवर जुलमी जमीनदारांच्या विरोधात बऱ्याच काळापासून कामगार संघर्ष करत होते. १९६८ साली डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्याच त्याचा कडेलोट झाला. तमिळ नाडूच्या नागपट्टिणम जिल्ह्यातल्या या गावातले दलित मजूर संपावर गेले होते. जास्त वेतन, शेतजमिनीची मालकी आणि सरंजामी अत्याचाराचा अंत या त्यांच्या मागण्या होत्या. जमीनदारांचा प्रतिसाद काय असावा? त्यांनी या वस्तीवरच्या ४४ दलित मजुरांना जिवंतपणी जाळून टाकलं. या धनदांडग्या जमीनदारांना दलितांमधली ही राजकीय चेतना सहन झाली नाही आणि त्यांनी आसपासच्या गावातल्या मजुरांना काम द्यायचं ठरवलंच पण जोरकसपणे संपाला उत्तर देण्याचाही निर्णय घेतला.
२५ डिसेंबरच्या रात्री या जमीनदारांनी वस्तीला वेढा घातला आणि बाहेर पडण्याचे सगळे मार्ग बंद करून टाकले. ४४ मजूर एका झोपडीत शिरले होते, त्या झोपडीला बाहेरून कुलुप घालण्यात आलं आणि त्यानंतर तिला आग लावण्यात आली. या सगळ्यांमध्ये निम्मे – ११ मुली आणि ११ मुलं – १६ वर्षांखालची होती. दोघांनी सत्तरी पार केली होती. २९ स्त्रिया आणि १५ पुरुष होते. सगळे दलित आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे समर्थक.
१९७५ साली मद्रास उच्च न्यायालयाने या खुनाच्या सर्व २५ आरोपींची निर्दोष मुक्तता केली. पण मैथिली सिवरामन यांनी या अत्याचाराच्या सखोल नोंदी ठेवणं थांबवलं नाही. हे हत्याकांड तर त्यांनी उजेडात आणलंच पण त्या आड दडलेले जात आणि वर्गाधारित दमनाचे मुद्देही त्यांच्या सखोल विश्लेषणाने पुढे आणले. या आठवड्यात वयाच्या ८१ व्या वर्षी मैथिली सिवरामन कोविड-१९ मुळे मृत्यूमुखी पडल्या. ही कविता त्यांच्यासाठी...



