पोटात वाढणाऱ्या गोळ्यामुळे सुनीता देवी अगदी चिंतातुर होती. तिला खाणं जात नव्हतं, पोट डब्ब झाल्याची भावना होत होती. दोन महिने तिने दुर्लक्ष केलं पण त्यानंतर ती घराजवळच्या खाजगी दवाखान्यात गेली. डॉक्टरांनी जे सांगितलं त्याने ती चक्रावलीच. “आप को बच्चा ठहर गया है.”
हे कसं काय होऊ शकतं, तिला समजेनाच. दिवस जाऊ नयेत म्हणून तांबी बसवली त्याला सहा महिने देखील झाले नव्हते.
२०१९ साली घडलेली ही घटना सांगत असताना तिचा चेहरा आणखीच फिका पडत जातो. केसांचा अंबाडा बांधलेला. खोल गेलेले डोळे थकले होते. तिच्या चेहऱ्यावरची उजळलेली एकच गोष्ट म्हणजे तिची लाल रंगाची टिकली.
सुनीता (नाव बदललं आहे) ३० वर्षांची आहे आणि तिला ४ ते १० वयोगटातली चार मुलं आहेत, दोन मुली-दोन मुलं. २०१९ साली मे महिन्यात सुनीतानं ठरवलं की आता आणखी मूल नको. तेव्हा तिचा सगळ्यात धाकटा मुलगा दोन वर्षांचा होता. त्या भागात काम करणाऱ्या आशा कार्यकर्तीकडून तिला कुटुंब नियोजनाच्या वेगवेगळ्या पद्धतींची माहिती मिळाली होती. सगळ्या पर्यायांचा विचार केल्यावर तिने गर्भनिरोधक इंजेक्शन असणाऱ्या अंतराची निवड केली होती. हे इंजेक्शन घेतल्यावर तीन महिने तरी दिवस जात नाहीत. “मी विचार केला, इंजेक्शन घेऊन तरी पाहू या,” ती सांगते.
सुनीताचं घर म्हणजे ८ बाय १० फुटाची एक खोली. जमिनीवरच्या चटईवर बसून आम्ही बोलत होतो. कोपऱ्यातल्या गॅसच्या टाकीवर आणखी काही चटया घडी करून ठेवलेल्या होत्या. शेजारच्या खोलीत सुनीताचा दीर आणि त्याचं कुटुंब राहतं. आणि आणखी एक खोली दिसते, तिथे तिचा दुसरा दीर राहतो. नैऋत्य दिल्ली जिल्ह्याच्या नजफगडमधल्या महेश गार्डन परिसरात सुनीता राहते.
गोपाळ नगर प्राथमिक आरोग्य केंद्र सुनीताच्या घरापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे. आशा कार्यकर्तीबरोबर ती अंतरा इंजेक्शन घ्यायला तिथेच गेली होती. पण पीएचसीतल्या डॉक्टरांनी वेगळाच सल्ला दिला. “डॉक्टर मला इंजेक्शनऐवजी तांबीबद्दल माहिती द्यायला लागल्या. तांबी जास्त सुरक्षित असल्याने तीच बसवून घे, असं त्या म्हणाल्या,” सुनीता सांगते. “मी स्वतः डॉक्टरांना तांबीबद्दल काहीही विचारलं नव्हतं,” ती ठाम आवाजात सांगते. “पण डॉक्टर सारखी म्हणत होती, की सगळं ठीक होईल. ‘तुला अजून मुलं नको आहेत ना?’ तिने मला विचारलं होतं.”








