दुपार टळलीये, नडसुर कातकरीवाडीच्या देवळाबाहेर काही गाड्या येतात. विष्णू वाघमारे घरातून डोकावतो आणि कातकरी बोलीत काहीतरी बोलतो. पंधरा बाया आणि गड्यांचा घोळका आलेल्या पाव्हण्याचं स्वागत करायला बाहेर येतो.
“ते मजुरांची ‘टोळी’ न्यायला आलेत. आता ते सगळे वाटाघाटी करणार. आमच्या लोकांना काही हे समजत नाही का हे मुकादम त्यांना वेडं बनवतायत. ते आमचं शोषण करतात तरीही आम्ही परत परत त्यांच्यासाठी काम करायला जातो. मी मात्र कधीच भट्टीवर जात नाही,” २१ वर्षांचा विष्णू सांगतो. तो आसपासच्या गावांमध्ये मिळेल ते काम करतो.
नडसूर कातकरवाडी महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्याच्या सुधागड तालुक्यातल्या नडसूर पंचायतीची एक वाडी आहे. इथल्या ३६० कातकऱ्यांपैकी बहुतेक जण नोव्हेंबरच्या मध्यावर, दिवाळीनंतर गाव सोडून कामाला बाहेर पडतात. कातकरी समुदाय विशेषत्वाने बिकट स्थितीतील आदिवासी समुदाय (Particularly Vulnerable Tribal Group) म्हणून सूचित केलेला आहे. ते आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातल्या तसंच महाराष्ट्रातल्या चिपळूण, अमरावती आणि इतर काही ठिकाणच्या भट्ट्यांमध्ये कामाला जातात. जूनपर्यंत ते आपल्या वाड्यांवर परततात. या भट्ट्यांमध्ये बाभळीच्या लाकडापासून कोळसा तयार केला जातो, जो खानावळीतल्या तंदूर आणि कोळशाच्या भट्ट्यांमध्ये वापरला जातो.
मजुरांना घेऊन जाणारे ट्रक महाराष्ट्रातल्या भट्ट्यांवर १८ तासांनी तर बाहेरच्या राज्यांमध्ये तब्बल ३८ तासांनी पोचतात. भट्ट्यांपाशी कातकरी मंडळी उघड्यावर गव्हाचं तणीस, बांबू आणि उसाचं पाचट वापरून पालं टाकतात. इथे ना वीज ना संडास, मात्र जंगली प्राण्याचं किंवा सापाचं भय असतंच.






