सकाळच्या वेळी अनू झाडाखाली प्लास्टिकची फाटकी सतरंजी टाकून बसलीये. केस विस्कटलेले आणि चेहऱ्याचा रंग उडालेला. तिथून जाणारे लोकही तिच्याशी जरा अंतर राखूनच बोलतायत. जवळ काही गुरं निवांत बसलीयेत आणि कडबा उन्हात वाळतोय.
“पाऊस असला तरी मी छत्री घेऊन इथे झाडाखाली बसते पण घरात पाय ठेवत नाही. माझी सावली देखील कुणावर पडता कामा नये. देवाचा कोप झालेला परवडायचा नाही,” अनू म्हणते.
तिच्या घरापासून १०० मीटरवर, मोकळ्या माळावर असलेलं हे झाड दर महिन्यात तिची पाळी आली की तिचं घर असतं.
“माझी मुलगी माझ्यासाठी ताटलीत जेवण ठेवून जाते,” अनू सांगते (नाव बदललं आहे). बाजूला बसलं की वापरायची भांडी पण वेगळी आहेत. “आता मी काही मजा म्हणून इथे बसलेले नाहीये. मला [घरी] काम आहे, पण आमची रीत जपायचीये म्हणून मी इथे येते. पण जेव्हा खूप काम असतं तेव्हा मी आमच्या रानातलं काम करते की.” अनूच्या घरची १.५ एकर शेती आहे आणि त्यात ते नाचणीचं पीक घेतात.
या ‘विलगीकरणाच्या’ काळात अनू एकटी असली तरी ही रीत पाळणारी काही ती एकमेव नाहीये. तिच्या मुली, वय १९ आणि १७, या दोघीही हेच करतात (तिच्या २१ वर्षांच्या थोरल्या मुलीचं लग्न झालंय). तिच्या पाड्यावरच्या कडुगोल्ला समुदायाच्या साधारण २५ कुटुंबांमधल्या सगळ्याच स्त्रियांना अशा प्रकारे बाजूला बसायला लागतं.
नुकत्याच बाळंत झालेल्या बायांना तर जास्तच कठोर निर्बंध सहन करावे लागतात. अनूला आसरा देणाऱ्या झाडापासून जवळच एकमेकींपासून जराशा अंतरावर सहा झोपड्या आहेत. बाळ-बाळंतीण इथे येऊन राहतात. एरवी या रिकाम्याच असतात. आणि ज्यांची पाळी सुरू आहे अशांनी झाडाखालीच मुक्काम करायचा असतो.















