“कधी कधी तरी एखादी बाई रात्रीच मला फोन करायची किंवा घरच्या कुणा पुरुष माणसाला निरोधचं पाकिट घेऊन जायला धाडायची,” कलावती सोनी सांगतात. टिकरीतल्या ५४ वर्षीय ‘डेपो दीदी’ कितीही उशीर झाला तरी खळखळ करत नाहीत. गावातल्या महिलांना लागणाऱ्या अशा सगळ्या गोष्टी त्या पुरवतात. “माझं काम रात्रीसुद्धा चालू असतं,” त्या हसत हसत म्हणतात. उत्तर प्रदेशच्या अमेठी जिल्ह्यातल्या आपल्या गावी छोट्याशा घरात चारपाईवर बसून त्या माझ्याशी बोलत होत्या. “इतनी कोई बडी बात नही है,” कलावती आपल्या कामाबद्दल बोलताना सांगतात.
या गावात काम करणाऱ्या एका सामाजिक संस्थेकडून ‘डेपो दीदी’बद्दल बरंच काही ऐकलं होतं त्यामुळे आमची उत्सुकता चाळवली गेली होती. आणि आम्ही कलावतींच्या घरी पोचलो. “जा रे, जरा ती पिशवी घेऊन ये,” कलावती त्यांच्या नातवाला सांगतात. आणि क्षणाचाही विलंब न लावता तो चिमुकला घरातून एक प्लास्टिकची पिशवी घेऊन धावत येतो. आणि मग त्या पिशवीतून काय काय गंमती जंमती बाहेर पडायला लागतात. विविध प्रकारचे निरोध, तोंडावाटे घ्यायच्या गर्भनिरोधक गोळ्या, जलसंजीवनी आणि काय काय. आपल्या बाजेवर प्रदर्शन मांडल्यासारखं त्या सगळं नीट मांडून ठेवतात.
“इतनी कोई बडी बात नही है,” पालुपद असल्यासारखं त्या म्हणतात. “सुरुवातीला मी घरातल्या इकडच्या तिकडच्या गोष्टींनी सुरुवात करायचे. त्यानंतर घरी कसं काय चाललंय, सासूबरोबरची काही किटकिट, मुलांबद्दल असं सगळं विचारून घ्यायचे. शांतपणे त्यांचं सगळं ऐकून घ्यायचे. या गप्पागोष्टींमधून - थोड्या नाही, मला खूप बोलायला लागतं - मला काही गोष्टी लक्षात यायला लागल्या. सगळ्या बायांना सारख्याच अडचणी येतात. मग एकमेकींची मदत केली तर? बास,” आपण टिकरी गावात ‘डेपो दीदी’ झालो याचा प्रवासच कलावती उलगडून सांगतात.
आरोग्यवर्धक सवयींना प्रोत्साहन आणि आवश्यक वस्तूंचं वाटप करण्यासाठी गावातल्याच बायांची नेमणूक डेपो होल्डर म्हणून करण्यात येते. त्या नावावरून ‘डेपो दीदी’ हे नाव पडलं. पण कलावती अंगणवाडी ताई नाहीत किंवा आशा कार्यकर्त्या देखील नाहीत. खरं तर डेपो होल्डरचं काम यांच्याकडे असतं. पण त्या झोला छापही नाहीत. पण त्यांच्याकडे प्रजनन आरोग्याचा विचार करता बायांना लागणाऱ्या सगळ्या गोष्टींचा साठा असतो आणि त्या बायांच्या लैंगिक आणि प्रजननासंबंधीच्या समस्यांबद्दल त्यांच्याशी बोलतात देखील.







