५ एप्रिल २०१७ रोजी पारीवर प्रकाशित झालेल्या ओव्यांपैकी पहिल्या पाच ओव्या बीड जिल्ह्यातल्या सावरगावच्या राधाबाई बोऱ्हाडेंनी गायल्या होत्या. १४ एप्रिल रोजी असणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यासाठी हा महिनाभर आम्ही पारीवर ओव्यांची मालिका सादर करत आहोत. त्यातल्या या पहिल्या काही ओव्या.
या पाच ओव्या, बुद्ध, भीमराव, धम्म, संघ आणि रमाबाई आंबेडकरांना वाहिल्या होत्या. या मालिकेतल्या या शेवटच्या १० ओव्या राधाबाईंच्याच खड्या आवाजात आहेत. इतर स्त्रियांनी त्यांना साथ दिली आहे.
या संचातल्या ओव्यांमधली पहिली ओवी, (म्हणजे त्यांनी गायलेली सहावी ओवी) राधाबाईंनी जोतिबांना वाहिली आहे. जोतिराव फुले हे ज्येष्ठ समाज सुधारक, लेखक आणि विचारवंत होते. जाती अंताची चळवळ, स्त्री-पुरुष समानता आणि इतरही अनेक सामाजिक प्रश्नांवरचं त्यांचं काम लाखमोलाचं आहे.
दुसरी ओवी बौद्ध धर्माचं प्रतीक असणाऱ्या पंचरंगी झेंड्यासाठी गायली आहे. हा झेंडा जगभर बौद्ध धर्माचं प्रतीक मानला जातो. सात कोटी लोकांना या झेंड्याने बौद्ध धर्म सांगितला आहे असं दुसऱ्या ओळीत म्हटलं आहे. बाबासाहेबांनी धर्मांतर केलं तेव्हा त्यांच्यासोबत भारतातल्या सात कोटी दलित जनतेने बौद्ध धर्म स्वीकारला, त्याचा हा संदर्भ आहे.
तिसऱ्या ओवीमध्ये राधाबाई सगळ्यांना उद्धाराच्या दिशेने वाटचाल करण्याचं आवाहन करतात. गरिबी जरी आली तरी शिक्षण सोडू नक्का असा सल्लाही त्या देतात. चौथ्या ओवीमध्ये एकी ठेवण्याचं आणि आपसातली फाटाफूट थांबवण्याचं आवाहन करतानाच राधाबाई सगळ्यांना बुद्धाची शिकवण लक्षात ठेवायला सांगतात. पाचव्या ओवीमध्ये त्या सगळ्यांना आठवण करून देतात की बाबासाहेबांनी त्यांना बुद्धाच्या मार्गावर आणलं आहे, ते आता गेले असले तरी आपण आता त्या धर्माचं नीट पालन करायला पाहिजे.




