गायत्री कच्चरबी न चुकता दर महिन्याला पोटात होणार्या असह्य वेदना सोसत असते. वेदनांचे ते तीन दिवस तिला आपल्या मासिक पाळीची आठवण करून देतात, पण तिची पाळी वर्षभरापूर्वीच थांबली आहे.
“पोटात खूप दुखतं आणि मला कळतं की आपली पाळी आली आहे, पण मला रक्तस्राव मात्र होत नाही,” अठ्ठावीस वर्षांची गायत्री सांगते. “तीन मुलांना जन्म दिला, त्यामुळे आता माझ्या शरीरात कदाचित तेवढं रक्तच शिल्लक नसेल.” गायत्रीला ॲमनोरिया आहे म्हणजे तिला पाळीच येत नाही. पण तरीही पोटात दुखणं, पेटके येणं, पाठदुखी या वेदनांपासून मात्र तिची सुटका झालेली नाही. “इतकं दुखतं, जणू प्रसूतीवेदनाच! उठून बसणंही कठीण होतं मला,” गायत्री सांगते.
उंच आणि शेलाटी, चमकदार डोळ्यांची गायत्री शेतमजूर आहे. कर्नाटकातल्या मडिगा या दलित समाजाच्या वस्तीत, ‘मडिगरा केरी’मध्ये ती राहते. हावेरी जिल्ह्यातल्या रानीबेन्नुर तालुक्यात, आसुंदी गावाच्या वेशीवर ही वस्ती आहे.
काही वर्षं गायत्रीला पोटदुखीचा त्रास होत होता. गेल्या वर्षी लघवी करतानाही तिला वेदना व्हायला लागल्या आणि तिच्या गावापासून दहा किलोमीटरवर असलेल्या ब्याडगी गावातल्या एका खाजगी दवाखान्यात ती गेली.
















