“आम्हाला सगळे अशी तुच्छतेची वागणूक का देतात?” शीतल विचारते. “किन्नर म्हणून जन्माला आलो म्हणून काय आम्हाला आमची इज्जत नाही का?”
वर्षानुवर्षं आलेले कटू अनुभव शीतलच्या शब्दातून व्यक्त होत होते. वय २२, पण दहा वर्षं भेदभाव सहन केलेला आहे – शाळेत, कामावर, रस्त्यावर, जवळ जवळ सगळीकडेच.
या सगळ्याची सुरुवात झाली, इचलकरंजीच्या नेहरूनगरमध्ये जेव्हा ती १४ वर्षांची होती तेव्हा – तिचं नाव होतं अरविंद. “मी आठवी – नववीत होते तेव्हा मला वर्गातल्या मुलींसारखे कपडे घालू वाटायचे. हे असं का होतंय मला अजिबात कळत नव्हतं... मी आरशात मलाच न्याहाळत बसायचे आणि मग माझे वडील खेकसायचे, ‘असा बायल्यासारखा आरशात काय पाहत बसलायस, जा जरा पोरात खेळ’. मी जेव्हा त्यांना सांगितलं की मला साडी ल्यायचीये, पोरीसारखं रहायचंय, त्यांनी मला मारलं अन् म्हणाले, तुला वेड्याच्या हॉस्पिटलात टाकेन. त्यांनी मला मारलं तेव्हा खूप रडले मी...”
शीतलच्या (तिच्या विनंतीवरून नाव बदललं आहे) घरच्यांनी त्यांचा पोरगा ‘बरा’ व्हावा म्हणून त्याला तांत्रिकाकडे नेऊन गंडेदोरे केले. “माझी आई म्हणायची माझ्यावर कोणी तरी करणी केलीये. माझ्या बापानं [जे भंगार व्यावसायिक होते] कोंबडं पण चढवलं. माझ्या आई-वडलांना हेच समजत नव्हतं की मी जरी पुरुष म्हणून जन्माला आलो असलो तरी मला एका बाई व्हायचं होतं. त्यांनी माझं काहीच ऐकलं नाही.”
सोळाव्या वर्षी शीतलनं घर सोडलं आणि ती बाजार मागायला लागली – आजही ती हेच काम करतीये. सकाळी १० वाजल्यापासून सांजेपर्यंत ती दुकानात जाऊन पैसे मागते, जवळच्या जयसिंगपूर, कोल्हापूर आणि सांगलीसारख्या शहरात जाऊनही ती बाजार मागते आणि दिवसाचे १००-५०० रुपये मिळतात तिला. कधी कधी तिला आणि तिच्या चार-पाच मैत्रिणींना लग्नात किंवा बारशाला, सणासुदीला नाचायला बोलावतात तेव्हा लोक दोन तीन हजार रुपये देतात.








