सोमवारची सकाळ होती. सदर शहरातलं प्राथमिक आरोग्य केंद्र नुकतंच उघडलं होतं. सुनीता दत्ता आणि तिचा नवरा तिथे पोचले होते. पण तिथल्या नर्सने सुनीताला प्रसूतीच्या वॉर्डात नेलं आणि काही क्षणातच सुनीता आणि तिचा नवरा तिथून निघाले. “इस में कैसा होगा बच्चा? बहुत गंदगी है इधर,” सुनीता म्हणते. आणि ज्या रिक्षानी ती इथे आली त्याच रिक्षात बसून जाते.
“तिला आजची तारीख दिलीये – आता आम्हाला खाजगी दवाखान्यात जावं लागणार,” तिचा नवरा अमर दत्ता म्हणतो. त्यांना घेऊन रिक्षा निघून जाते. सुनीताचं तिसरं बाळ याच प्राथमिक आरोग्य केंद्रात जन्माला आलं होतं. पण चौथ्या बाळाच्या वेळी मात्र तिने वेगळीकडे जाण्याचा निर्णय घेतला.
सकाळचे ११ वाजलेत. सदर पीएचसीच्या प्रसूती कक्षात रक्ताचे डाग पडलेली जमीन अजून साफ पुसून झालेली नाही. आदल्या दिवशीच्या बाळंतपणानंतर सगळे डाग तसेच आहेत अजून. सफाई कामगार अजून यायचाय.
“माझे पती मला घ्यायला येणारेत. मी त्यांची वाट बघतीये. माझी आजची ड्यूटी संपलीये. माझी रात्र पाळी होती. पण कुणी पेशंट नव्हते. पण डासांमुळे माझा डोळ्याला डोळा लागला नाहीये,” ४३ वर्षीय पुष्पा देवी सांगतात (नाव बदलले आहे). पुष्पा बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातल्या सदर प्राथमिक आरोग्य केंद्रात नर्स म्हणून काम करतात. त्या त्यांच्या ऑफिसमध्ये आमच्याशी बोलतात. कामावर असलेल्या नर्ससाठी असणाऱ्या खुर्चीत बसून. खुर्चीच्या मागे एका टेबलावर काही कागद विखुरलेले आहेत आणि एक लाकडी खाट आहे. याच खाटेवर पुष्पांनी रात्री झोपण्याचा वृथा प्रयत्न केला होता.
मळकी, कधी काळी पिवळसर रंगाची असलेली मच्छरदाणी पलंगावर अडकवून ठेवलीये. त्याला पडलेली भोकं डासांना सहज आत येण्याइतकी मोठी आहेत. खालचं अंथरुण गुंडाळून उशीबरोबर बाजूला ठेवून दिलंय. रात्र पाळीवर येणाऱ्या दुसऱ्या नर्ससाठी.







