तालाबिराच्या गावकऱ्यांचाही असाच दावा आहे की जंगलतोडीची मान्यता मिळवण्यासाठी त्यांच्या ग्रामसभेचे बनावट संमती ठराव सादर करण्यात आलेले आहेत. याबद्दलची राज्य सरकारच्या विविध खात्यांकडे दाखल करण्यात आलेल्या त्यांच्या हस्तलिखित तक्रारी ते दाखवतात. “हे सगळं बनावट कागदपत्रांच्या आधारे करण्यात आलंय. आम्ही जंगल तोडायला कधीही संमती दिलेली नाही,” वॉर्ड सदस्य असणाऱ्या सुषमा पात्रा सांगतात. राऊत सांगतात, “उलटपक्षी, २८ मे २०१२ रोजी आम्ही तालाबिरा ग्राम्य जंगल समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना वन हक्क कायद्याअंतर्गत असलेल्या आमच्या हक्कांबाबत लेखी निवेदन दिलंय आणि याची प्रत आम्ही आमच्या बनावट संमतीविरोधातल्या तक्रारीलाही जोडली आहे.”
कांची कोहली नवी दिल्ली स्थित सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च या संस्थेत वरिष्ठ संशोधक आहेत. तालाबिरा जंगलतोडीसंबंधीची कागदपत्रं त्यांनी तपासली आहेत. त्या म्हणतात, “एकूणच, वनजमीन वर्ग करण्याची प्रक्रिया अंत्यत अपारदर्शी आहे. बाधित व्यक्तींनी पाहणी अहवाल आणि मान्यतेच्या शिफारशी इत्यादी कागदपत्रं क्वचितच पहायला मिळतात. तालाबिरा केसमध्येही ही सगळी लक्षणं दिसून येतात. जेव्हा झाडं तोडायला सुरुवात झाली तेव्हा कुठे गावकऱ्यांना चाहूल लागली की पूर्वापारपासून त्यांचा ज्या जंगलावर हक्क आहे त्या भागात खाणीचा विस्तार होणार आहे.”
कोहली म्हणतात की ही कागदपत्रं वाचली तर, “ढिसाळ पाहणी अहवाल आणि , थातुरमातुर पद्धतीने मान्यता दिल्याचं उघड होतं. १.३ लाख वृक्ष तोडल्याचा परिणाम नगण्य असल्याची नोंद केली आहे आणि त्याबद्दल कुणी चकार शब्दही काढलेला नाही. ग्रामसभांचे ठराव पर्यावरण मंत्रालयाच्या वन सल्लागार समितीने पडताळूनही पाहिलेले नाहीत. एकूण काय तर वन वर्ग करण्याच्या प्रक्रियेत गंभीर स्वरुपाच्या कायदेशीर त्रुटी असल्याचं दिसून येतं.”
अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांच्या आंदोलनाचं म्हणणं ऐकून घेतलंच पाहिजे असं रंजन पांडा म्हणतात. “वातावरण बदलांसाठी सर्वात जास्त जबाबदार आहे तो कोळसा आणि वातावरण बदलांवर उपाय म्हणून सगळं जग कोळशावर चालणारे वीज प्रकल्प बंद करण्याच्या प्रयत्नात आहे.”
“एक तर सरकार लोकांना वन हक्क कायद्याची पुरेशी माहितीच देत नाही. आम्ही आमच्या स्वतःच्या बळावर दावे दाखल केले होते. आणि कोणताही कायदा अस्तित्वात नसताना देखील आम्ही वनांचं रक्षण करतच होतो,” दिलीप साहू सांगतात. “सरकार आज म्हणतंय की गावकऱ्यांनी कंपनीला जंगल देऊन टाकायची संमती दिली आहे म्हणून. मला त्यांना एकच प्रश्न विचारायचाय, ‘तुमच्याकडे आमची संमती आहे ना, मग कंपनीला झाडं तोडता यावीत यासाठी आमच्या गावांमध्ये एवढ्या संख्येने पोलिस तैनात करण्याची तुम्हाला काय गरज होती?’”
परिशिष्टः अदानी एंटरप्राइजेस यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार त्यांनी तालाबिरा कोळसा खाण क्षेत्रात कसलीही वृक्षतोड केलेली नाही. त्यांची ही भूमिका मांडली जावी या दृष्टीने हा लेख ९ जानेवारी, २०२० रोजी अद्ययावत करण्यात आले आहे.
अनुवादः मेधा काळे