त्यांना अंधाराची भीती वाटत नाही. थोड्या थोड्या वेळाने रेल्वेगाड्या जातात, त्यांचंही काही वाटत नाही. त्यांना सतत भीती वाटते ती एकच, कोणी पुरुष आपल्याला पाहातायत...
‘‘रात्रीच्या वेळी एकच शौचालय उपलब्ध असतं, रेल्वेची पटरी,’’ सतरा वर्षांची नीतू कुमारी सांगते.
दक्षिण मध्य पाटणामधल्या यारपूर भागात वॉर्ड नंबर ९ झोपडपट्टीत नीतू राहाते. वस्तीच्या मध्यभागी सिमेंटचा एक चौकोन आहे. तिथे रांगेने नळ लावलेले आहेत. फक्त चड्डीवर असलेले दोन पुरुष तिथे साबणाने खसाखसा आपलं अंग घासत अंघोळ करत असतात. जवळजवळ डझनभर मुलं पाण्यात खेळत असतात. एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत असतात, निसरड्या जमिनीवरून एकमेकांना खेचत असतात, कोणी पडलं की खिदळत असतात.
तिथून साधारण पन्नास मीटरवर दहा शौचालयांची एक रांग आहे. या वस्तीतली एकमेव. या सगळ्याच्या सगळ्या शौचालयांना मोठ्ठं टाळं लावलं आहे आणि त्यामुळे ती वापरातच नाहीत. कारण...? कोरोनामुळे त्यांचं ‘लोकार्पण’ करायला उशीर झालेला आहे. सध्या त्यांच्या पायर्यांवर बकर्यांचं एक कुटुंब विश्रांती घेतं आहे. मागे रेल्वेची पटरी आहे, तिच्यावर कचर्याचे ढीग पडले आहेत. चालू स्थितीतलं एक शौचालय आहे या वस्तीपासून चालत दहा मिनिटांच्या अंतरावर. रेल्वे पटरी पार करून वस्तीतले काही जण यारपूरच्या दुसर्या टोकाला जातात, पण तिथेही पोचायला दहा मिनिटं लागतातच.
‘‘मुलांना काय, कधीही कुठेही करता येतं. मुली मात्र फक्त रात्री रेल्वे पटरीवर जातात,’’ नीतू सांगते. ती बीएच्या पहिल्या वर्षाला आहे. (सर्व नावं बदलली आहेत.) तिच्या वस्तीतल्या इतर मुलींपेक्षा नीतू स्वतःला ‘लकी’ समजते. कारण तिला दिवसा दोनशे मीटरवर राहाणार्या तिच्या आत्याच्या घरातलं स्वच्छतागृह वापरता येतं.
‘‘आमचं घर दोन खोल्यांचं आहे. एका खोलीत माझा धाकटा भाऊ झोपतो, दुसर्या खोलीत आई आणि मी. त्यामुळे निदान घरात मला पॅड बदलायला खाजगी जागा मिळू शकते,’’ नीतू म्हणते. ‘‘अनेक मुली आणि बायका संपूर्ण दिवस थांबतात आणि रात्री रेल्वे पटरीवर सगळ्यात काळोखी जागा शोधून तिथे पॅड बदलतात.’’










