डोंगरात राहणाऱ्या २३ वर्षीय रानो सिंगला प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या आणि तिचा नवरा आणि सासू लगबगीने घरातून बाहेर आले. पहाट झाली होती, ५ वाजले होते. त्यांना दीड किलोमीटरची चढण चढून जायची होती, त्यानंतर मुख्य रस्ता लागणार. भाड्याने केलेली गाडी तिथे थांबली होती जी त्यांच्या गावाहून, सिवलीहून रानीखेतच्या खाजगी दवाखान्यात घेऊन जाणार होती.
डोली आणायचा त्यांनी प्रयत्न केला होता. ठाकूर समाजाच्या गरोदर बायांना एरवी चार भोई डोलीमधून चढ चढून नेतात. डोलीतून मुख्य रस्त्याला लागलं की थांबलेलं वाहन बाईला खाजगी दवाखान्यात नेऊन जातं. पण त्या दिवशी सकाळी डोली नव्हती आणि त्यामुळे त्यांनी चालायला सुरुवात केली.
रानो केवळ अर्धा रस्ता पार करू शकली. “आम्ही फार फार तर अर्धी वाट पार केली असेल, तेव्हाच माझ्या लक्षात आलं की [वेदनांमुळे] मी काही पूर्ण रस्ता पार करू शकणार नाहीये. ज्या क्षणी मी चालायचं सोडून रस्त्यात बसले, माझ्या नवऱ्याच्या सगळं लक्षात आलं आणि त्याने जवळच्याच एका कुटुंबाला साद घातली. ते आमच्या ओळखीतलेच होते. चाची १० मिनिटातच पाणी आणि एक चादर घेऊन आली. आणि मग माझी सासू आणि चाचीच्या मदतीने मी तिथेच बाळंत झाले.” (रानोचा नवरा ३४ वर्षांचा आहे आणि एका रेशन दुकानात मदतनीस म्हणून काम करतो. त्याला महिन्याला ८,००० रुपये पगार मिळतो. त्यांच्या कुटुंबातली तीन मोठी आणि एका बाळासाठी कमाईचा हाच एकमेव स्रोत आहे. तिला त्याचं नाव सांगायचं नव्हतं.)
“माझा मुलगा [जगत] इथे या जंगलात, अर्ध्या वाटेत जन्माला आला,” ती सांगते. झाडांनी वेढलेल्या त्या जंगलातल्या एका अरुंद वाटेवर झालेल्या बाळंतपणाच्या आठवणींनी आजही तिच्या अंगावर काटा येतो. “माझं बाळ असं जन्माला येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. आजही त्याचा विचार केला तर अंगावर शहारा येतो. पण देवाची कृपा, माझं बाळ सुखरुप होतं. आणि तीच सगळ्यात मोलाची गोष्ट आहे.”
२०२० च्या फेब्रुवारी महिन्यातल्या त्या सकाळी जगत जन्माला आला आणि त्यानंतर लगेच रानो चालत घरी परतली होती. तिच्या सासू, ५८ वर्षीय प्रतिमा सिंग नवजात जगतला आपल्या कुशीत घेऊन घरी आल्या होत्या.










