१ जानेवारी २०१९ रोजी म्हसवडच्या माणदेशी फौंडेशनने गंभीर दुष्काळाने होरपळलेल्या गावांसाठी महाराष्ट्रातली ही एवढ्या मोठ्या स्तरावरची पहिलीच चारा छावणी सुरू केली आहे. छावणीत जनावरांना चारा आणि पाणी (मोठ्या जनावराला रोज १५ किलो ओला चारा, १ किलो पेंड आणि ५० लिटर पाणी) पुरवलं जातं. तसंच प्रत्येक कुटुंबाला गुरांच्या संख्येप्रमाणे हिरवं शेडनेट दिलं जातं. “आजारी जनावरं असतील तर इतरांना लागण होऊ नये म्हणून त्यांची छावणीच्या बाहेर सोय करण्यात आली आहे. जनावरांचे दोन डॉक्टर दिवस रात्र काम करत आहेत,” माणदेशी फौंडेशनच्या चारा छावणीचे एक प्रमुख समन्वयक रवींद्र वीरकर सांगतात. छावणीत आलेल्या कुटुंबांना काही मूलभूत सुविधा देण्यात येत आहेत. उदा. प्रत्येक ‘वॉर्डात’ पाण्याच्या टाक्या ठेवण्यात आल्या आहेत (दर दोन तीन दिवसांनी पाण्याचा टँकर पाणी भरून जातो), आणि पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र टाकीदेखील बांधलेली आहे.
छावणीतली लक्ष्मींची खोप अगदी जेवढ्यास तेवढी. पाय पसरले तरी बाहेर यावेत इतकी. दोरीवर दोन पातळं, आडूला अडकवलेल्या पिशवीत चहा-साखरेची पुडी, काडेपेटी आणि थोडा शिधा. बाहेर तीन दगडाची चूल आणि पलिकडेच चारा, कडबा आणून टाकलेला. चूल, सरपण चहापुरतंच झालंच तर अन्न गरम करण्यापुरतं. “घरनं डबा येतो कुणाबरोबर तर...” लक्ष्मी सांगतात. पण, गेले दोन दिवस त्यांच्या घरनं डबाच आला नव्हता. पुतण्याच्या डब्यातले चार घास खाऊन त्यांनी कसं तरी भागवलं होतं. “आता आज जर का डबा आला नाही, तर दुपारी जीपने घरी जाऊन यावं लागतंय. बगा, मागच्या येळंला सुनेने निसत्या भाकरीच दिल्या बांधून. कोरड्यास काहीच नाही. जनावरासोबत मी पण कडबं खाऊ का आता? माझं नाव लक्ष्मी आन् हालत बगा कसली हाय...”.
लक्ष्मींचं गाव, वळई, ता. माण. ३८२ घरं असणाऱ्या या गावची लोकसंख्या आहे सुमारे १७६८. (जनगणना, २०११). “गावातली निम्मी माणसं सांगली, कोल्हापूरला कारखान्यांवर ऊसतोडीला जातात. दिवाळीला जाऊन पाडव्याला परत. पण यंदा काही सांगता येत नाही. ज्येष्ठाच्या आत कुणी बी माघारी येत नाही,” लक्ष्मींच्या खोपीपाशी ऊन खात बसलेले सत्तरी पार केलेले यशवंत धोंडिबा शिंदे सांगतात. माण तालुक्यातल्या पाणवनहून ते त्यांच्या चार गायी घेऊन छावणीवर आले आहेत. शेतीच्या प्रश्नावर किती तरी आंदोलनं केल्याचं ते सांगतात.
लक्ष्मींकडचं प्यायचं पाणी संपलंय म्हणून ते आपल्या एका पाव्हण्याला पाणी द्यायला सांगतात. बदल्यात लक्ष्मी त्यांच्यासाठी चहा टाकतात. चहा कोराच आणि तोही पितळीतून किंवा छोट्या ताटल्यांमधून पितात. एकमेकांना धरून माणसं आणि जनावरं दिवस काढतायत.