जेव्हा मुकांबिकाच्या आजोबांनी त्यांना यक्षगान नृत्य करताना पाहिलं त्यावेळची आठवत सांगतात त्या म्हणतात, “ते खूप नाराज झाले आणि त्यांनी मला फटकारलंही.” त्यांनी तिला सावध केलं की, कर्नाटकच्या किनारी प्रदेशातील आणि केरळच्या कासारगोडमधील महिलांना हे लोकनृत्य रंगमंचावर सादर करण्याची परवानगी नाहीये.
मुकांबिका वारंबल्ली आता ७५ वर्षांच्या आहेत, पण त्यांना तरुणवयात यक्षगान नृत्य करायची खूप आवड होती. त्यावेळी त्या उडुपी जिल्ह्यातल्या, मारवी या गावी रहायच्या. लोकनृत्याचा हा कार्यक्रम संध्याकाळी सुरू व्हायचा आणि पहाटेपर्यंत चालायचा. हा कार्यक्रम पाहण्यासाठी त्या कुटुंबीय आणि शेजारपाजाऱ्यांबरोबर आवडीनं जायच्याय इथं महिला प्रेक्षकांची संख्याही मोठी असायची. दुसऱ्या दिवशी त्या घराच्या अंगणात मित्रमैत्रिणींना एकत्र करायच्या आणि नृत्यनाट्याचे चादरी किंवा पंचा वापरून प्रसंग सादर करायच्या.
“आम्ही समोरच्या अंगणात नृत्य सादर करायचो, पण फक्त माझे आजोबा घरी नसल्यावरच,” त्या सांगतात. “आजोबांचं म्हणणं होतं की यक्षगान हे मुलींसाठी नाही.”
यक्षगान शब्दाचा अर्थ म्हणजे देवांची गाणी. हा लोकनृत्याच्या प्रकार कर्नाटकच्या किनारपट्टीच्या भागात आणि केरळच्या कासारगोड जिल्ह्यामध्ये गेली अनेक शतकं सादर केला जातोय. संगीत, नृत्य, संवाद आणि कथाकथनातून यात रामायण आणि महाभारतासारख्या पौराणिक कथा व महाकाव्य सादर केलं जातं. यक्षगान मेळ्यांना या प्रदेशातील प्रमुख मंदिरांचांही मोठ्या प्रमाणात पाठिंबा होता.
या नृत्यप्रकारात शारीरिक कसरती मोठ्या प्रमाणात असतात, स्थानिक पातळीवर त्याला गंडू कले म्हटलं जातं, ज्याचा अर्थ पुरुष कला प्रकार असाही होतो. या नृत्यात उंच उड्या आणि मोठ्या गिरक्या घेतल्या जातात. ज्यासाठी चपळता आणि शारीरिक बळकटीची गरज असते. साधारणपणे या गोष्टींत पुरुष वरचढ असतात. या नृत्यप्रकारात महिला पात्रंही पुरुषच सादर करतात.
“प्रेक्षकांना नाटक आणि कथा आधीच माहित असतात,” असं ज्येष्ठ यक्षगान कलाकार आणि यक्षगान कला अकादमीचे माजी अध्यक्ष एम. एल. सामगा म्हणतात. “पण प्रत्येक सादरीकरणाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो आणि ते प्रत्येक वेळी नवीन अनुभव घेतात. त्यांना आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे एकच अभिनेता वेगवेगळ्या पद्धतीने पात्र उलगडून दाखवतो.”














