सय्यद खुर्शीद यांनी अर्थसंकल्पाकडे फारसं लक्ष दिलं नाही. "मी तर वृत्तवाहिनी पाहण्याचा प्रयत्नही केला नाही," असं ७२ वर्षीय सय्यद म्हणतात. "तुम्हाला माहित नाही त्यातलं किती खरं आहे आणि किती प्रचार आहे."
सध्याच्या अर्थसंकल्पातील कर स्लॅबमधील बदलांबद्दल त्यांनी ऐकलं आहे कारण कोणीतरी त्याचा उल्लेख केला होता. "पण माझ्या मोहल्ल्यात अशी एकही व्यक्ती मला माहित नाही जिला याचा फायदा होईल," ते हसत म्हणतात. "हम अपना कमाते हैं और खाते हैं [ मी फक्त उदरनिर्वाहासाठी काम करतो ]."
सय्यद हे महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शहरात तब्बल ६० वर्षांहून अधिक काळापासून शिंपी आहेत. जेव्हा ते फक्त आठ वर्षांचे होते तेव्हा त्यांनी हे काम त्यांच्या वडिलांकडून शिकून घेतले. मात्र त्यांचा व्यवसाय आता पूर्वीसारखा फायदेशीर नाही. "तरुण पिढी तयार असलेलेच कपडे निवडते," ते स्पष्ट करतात.




