त्यांच्या घरी जात असताना वाटेत आम्हाला एक चौक लागला. “शेतकरी आणि कामगार असे एका चौकात उभे आहेत,” ते म्हणतात, “आणि चारही बाजूंनी त्यांच्यावर हल्ला होतोय – साम-दाम-दंड-भेद.” कौटिल्याच्या अर्थशास्त्रात राज्य करण्याचं जे सूत्र दिलं आहे त्याचा क्रिशन उल्लेख करतायत. कौटिल्याची ओळख चाणक्य अशीही आहे. इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात मौर्य साम्राज्यात महामंत्री, शिक्षक, मार्गदर्शक आणि कूटनीतीचा प्रणेता म्हणून ओळखला जातो.
क्रिशनच्या बोलण्यात मात्र वर्तमानातल्या चाणक्याचा उल्लेख येत राहतो!
“दिल्लीच्या वेशीवर ७०० शेतकऱ्यांचा जीव गेला. सत्ताधारी पक्षाने [भाजप] त्याची काहीही जबाबदारी घेतली नाही,” क्रिशन म्हणतात. २०२० साली दिल्लीच्या सीमेवर झालेल्या शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक आंदोलनाबद्दल बोलत असताना ते भाजपने रेटून पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांचा उल्लेख करतात आणि एक वर्षभरानंतर ते कसे मागे घ्यायला लागले त्याचाही.
“त्या [भाजप मंत्र्याचा मुलगा] टेनीने लखीमपूर खेरीत शेतकऱ्यांना कसं चिरडलं होतं ते आठवतंय का? ये मारने में कंजूसी नही करते.” २०२१ साली घडलेला उत्तर प्रदेशातला हा प्रसंग त्यांच्या मेंदूवर जणू कोरला गेलाय.
इतकंच नाही. भारतीय कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षपदी असलेला भाजपचा खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावरही पक्षाने काही कारवाई केली नाही हे देखील क्रिशनसारख्यांच्या पचनी पडलेलं नाही. “साक्षी मलिक आणि इतर किती तरी नावाजलेल्या कुस्तीगीर महिला गेल्या वर्षी दिल्लीत आंदोलन करत होत्या. अनेक महिलांचा त्याने लैंगिक छळ केला होता. एक लहान मुलगी पण होती त्यात. त्यासाठी त्याला अटक करा अशी त्यांची मागणी होती,” क्रिशन सांगतात.
२०१४ साली भाजपने आपल्या जाहीरनाम्यात महिलांवरील हिंसेला आळा घालण्याचं वचन दिलं होतं. “त्या सगळ्या वचनांचं काय झालं?” क्रिशन विचारतात. “ते स्वित्झर्लंडहून काळा पैसा परत आणणार होते आणि आपल्या खात्यात १५ लाख रुपये येणार होते म्हणे. पण वाट्याला काय आलं? भूक आणि रेशन.”