गर्दीनं ओसंडून वाहणाऱ्या आनंद विहार रेल्वे स्थानकावर सोनू कुमार रावत आणि त्याचं कुटुंब एका कोपरा बसलंय. त्यांच्या अवतीभवती प्रवासी, फेरीवाले आणि गाड्यांची ये-जा सुरू आहे. २७ वर्षांचा सोनू आपल्या सामानावर लक्ष ठेवून आहे. त्याची पत्नी सितारा खातून त्यांच्या लहान बाळाला कडेवर घेऊन उभी आहे. दुपारचे दोन वाजून गेलेत अन् कडाक्याच्या उन्हात गर्दीने भरलेल्या प्लॅटफॉर्मवर त्यांना अजून चार तास गाडीची वाट पहावी लागणार आहे, त्यानंतर ते बिहारला जाणाऱ्या लिच्छवी एक्सप्रेसमध्ये बसतील.
सोनू गवंडी आहे, तर सितारा बांधकाम साइटवर मजूर म्हणून काम करते. कामाच्या शोधात दोघेही दररोज सकाळी गाझियाबादमधील मजूर नाक्यावर जाऊन उभे राहतात. सोनू सांगतो, “मागचे काही आठवडे आम्ही दिवसभर मजूर नाक्यावर थांबलो, पण दोन-तीन दिवस आम्हाला काहीच काम मिळालं नाही.”
अमेरिका-इस्त्राईल आणि इराण युद्ध सुरू झाल्यानंतर होर्मूझची सामुद्रधुनी रोखल्यामुळे देशभरात एलपीजीचे दर गगनाला भिडलेत, याचा परिणाम म्हणून रावत कुटुंबासाठी दिल्लीत राहणं आता आर्थिकदृष्ट्या अशक्य झालंय.
आधी आमचे गॅस सिलिंडरसाठी १२०० रुपये, घर भाड्यासाठी २,५०० रुपये आणि विजेसाठी ५०० रुपये खर्च व्हायचे. जेवणाचा खर्च पकडण्याआधीच महिन्याला ४,००० ते ५,००० रुपये खर्च व्हायचे असं सोनू सांगतो. मात्र आता या मूलभूत गरजा पूर्ण करणं कठीण झाल्यामुळे आता त्यांच्याकडे गावी परतण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही.
अन् त्यांच्या या परतीच्या प्रवासात मोठी अस्वस्थता दडलीये. या जोडप्यानं घरातून पळून जाऊन आंतरधर्मीय लग्न केलं होतं. स्वतःची ओळख लपवून काम मिळवण्याच्या उद्देशाने ते वर्षाभरापूर्वी दिल्लीत आले होते. पण आता हाती काम नसल्यानं त्यांना पुन्हा आपल्या गावी परत जावं लागणार आहे. ते सिवान जिल्ह्यातल्या मैरवा इथल्या सिताराच्या घरी जाण्याचा प्रयत्न करतील, जिथे त्यांना घरचे स्वीकारतील अशी त्यांना आशा आहे.
हे जोडपं दिल्लीत कानावणी गावातल्या झोपडपट्टीत एका खोलीत राहतं. महिन्यातून २० दिवस काम मिळतं असं सोनू सांगतो. एखाद्या महिन्यात चांगलं काम मिळाल्यावर आम्ही प्रत्येकी १०,००० रुपये देखील कमावले आहेत, हे सांगताना एलपीजीच्या संकटामुळे त्याच्या घराचं कोलमडलेलं गणित तो एक उसासा टाकून स्पष्ट करतो.






