“परीक्षेची तयारी करणं ही पूर्णपणे आमची जबाबदारी आहे आणि प्रश्नपत्रिका सुरक्षित ठेवणं ही शासनाची जबाबदारी आहे,” हे सांगताना अंशु कुमारीचा संताप स्पष्टपणे दिसत होता.
ही २४ वर्षांची तरुणी स्पर्धा परीक्षेचं ओझं जाणून आहे. अंशु एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करते आणि सोबतच मुक्त विद्यापीठातून बी. एडचं शिक्षणही घेतेय. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा देऊन तिला सरकारी शाळेत नोकरी मिळवायची आहे आणि याचीच ती तयारी करतेय.
सरकारी नोकरी मिळेल या आशेनं अंशु २०२३ आणि २०२४ मध्ये बँक भरती परीक्षेला बसली. पण तिला यश काही आलं नाही, म्हणूनच तिनं शिक्षकी पेशाकडे वळायचं ठरवलं आणि रात्रंदिवस जागून शिक्षक पात्रता परीक्षेचा अभ्यास केला.













