झुनू अगदी मजेत ताडाच्या पानांवर ताव मारतीये. खरं तर हे काही या पाळीव बकरीचं खाणं नाही. पण अधून तिला ही चविष्ट पानं खायला मिळतात.
ताडाच्या पानापासून टोपी विणणाऱ्या कल्याणी पात्रोंना मात्र झुनूचं हे पानांवर ताव मारणं फारसं पसंत नाही. आणि मग त्या झुनूला एक टप्पल मारते आणि हल्ली विरळ होत चाललेल्या ही पानं वाचवायचा प्रयत्न करतात.
आणि त्यालाही कारण आहे. ताडाचं झाड जवळजवळ ३० मीटर उंच असतं. “सगळ्यात मोठी अडचण म्हणजे पानं काढणे. बंगालमधलं हे सगळ्यात उंच झाड आहे. झाडं चिक्कार आहेत पण त्यावर चढण्याचं कौशल्य मात्र आता कुठे दिसत नाही,” ५० वर्षीय कल्याणी दी सांगतात.
त्यांच्याच शेजारी राहणाऱ्या छाया प्रामाणिक देखील दुजोरा देतात. म्हणतात, “पूर्वी घरची माणसं पानं घेऊन यायची. पण आजकालच्या तरुणांना झाडावर चढताच येत नाही.” त्यानंतर मात्र छाया दी जरा वेगळी बाजू मांडतात. “तसंही आजकाल झाडं चढण्याइतका वेळ कुणाकडे आहे?”
कल्याणी दी आणि छाया दी अखुडी डोम समाजाच्या आहेत. हा समाज पिढ्या न पिढ्या या पानांपासून वस्तू तयार करत आला आहे. “आमचा हा सगळा भाग ताडपानं आणि बांबूच्या कामासाठी प्रसिद्ध आहे,” कल्याणी दी सांगतात. बोलता बोलता हातानी पानं विणणं सुरूच असतं. “पूर्वी आमच्या समाजात लग्न ठरवताना एखाद्या गड्याला किंवा बाईला बांबूकाम येतं का नाही हे फार महत्त्वाचं मानलं जायचं.” आता मात्र राज्यात अनुसूचित जातींमध्ये समाविष्ट असलेली डोम समाजच फक्त बांबूचं काम करतात. चोप्या, हाताने फिरवायचे पंखे आणि इतर अनेक वस्तू या ताडाच्या पानांपासून आणि बांबूपासून तयार केल्या जातात.


























