खुमनिया आदिवासी काफरच्या सरपंच आहेत. कागदोपत्री १०० टक्के त्याच सरपंच आहेत.
पण प्रत्यक्षात स्थिती काय दिसते? “कोई नाममात्र का सरपंच भी नही समझता इस गांव में,” त्या सांगतात.
१४ जून २०२२ रोजी सहरिया आदिवासी असलेल्या ५८ वर्षीय खुमनियांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली होती. त्यांना पंचायतीच्या कचेरीत हजर रहायला सांगितल्याचं त्यांना आठवतं. मध्य प्रदेशातल्या काफर गावातलं स्थानिक स्वराज्य संस्थेचं हे कार्यालय. तेव्हा त्या कचेरीत पाय ठेवला तो पहिला आणि शेवटचा.
“मला फक्त सुरुवातीला एकदा बोलावलं होतं,” खुमनिया सांगतात. त्या तिथे गेल्यावर त्यांना एक प्रमाणपत्र देण्यात आलं. त्याच्यावर लिहिलं होतं की गावाच्या सरपंचपदी त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. खुमनिया कधी शाळेची पायरी चढलेल्या नाहीत. त्यांना लिहिता किंवा वाचता येत नसल्याने कुणी तरी त्यांना ते पत्र वाचून दाखवलं होतं.
“हमाई पंचायत में आदिवासी सीट आयी हती, तो गांव के बडे लोगों ने हमउ नाम दाव. माझ्या विरोधात कुणी उभं राहिलं नाही,” खुमनिया बुंदेलखंडी भाषेत बोलतात.







