मी माझ्या डायरीत काय लिहितोय ते लाजो देवी उत्सुकतेने पाहत होती. पण काही मिनिटांतच त्या उत्सुकतेची जागा भीतीने घेतली.
“एइ सब लिख के थानवा में देबहु का?” ती विचारते. बिहारच्या मगध प्रांतात बोलली जाणारी मगही तिची भाषा. मोहाच्या फुलांपासून महुआ कशी गाळायची आणि त्याच्यावरच तिचं पोट अलवंबून आहे असं सगळं ती मला सांगत होती.
सुरुवातीला काही तिने आपण दारू गाळत असल्याचं मान्य करायला खळखळ केली. मात्र तिच्या घरातल्या एका कोपऱ्यात दोन डब्यांमध्ये सडलेला आठ किलो गूळ होता त्याने बिंग फुटलं. माझी नजर त्या डब्यांवर जाताच तिने काळ्या प्लास्टिकने ते झाकून टाकले आणि म्हणाली, “होळी आहे ना, म्हणून.”
घरी दारू गाळत असल्याबद्दल वाटणारी चिंता आणि भीती निराधार नाही. बिहार मध्य निषेध व उत्पाद शुल्क कायदा २०१६ नुसार दारूचं उत्पादन करणे, ती बाळगणे, सेवन आणि वाटप यावर बंदी आहे. यात महुआचाही समावेश केलेला आहे. या गुन्ह्यासाठी जन्मठेपेपर्यंत तुरुंगवास आणि १-१० लाखांपर्यंतचा दंड अशा शिक्षेची तरतूद आहे.






