"मला कॉलेजात जायचं होतं, डिग्री मिळवायची होती" दोन वाक्य उच्चारताच संकेत लोखंडेला धाप लागते. तो अंगणातल्या बाजेवर बसलाय. थकव्यानं कंबरेत वाकलाय, नि कोपरांना गुडघ्यांचा टेकू देऊन हा २३ वर्षीय तरुण आपलं स्वप्नं सांगतोय, "बारावीची परीक्षा झालेली. जूनमध्ये रिझल्ट येणार होता." संकेत सुस्कारा टाकतो, "करिअरबद्दल मी फार ठरवलं नव्हतं, पण कॉलेजात शिकायचं नक्की होतं. " २०२१ मध्ये या तरुणाचं मन असे मनोरे रचत होतं. नि आता हा इतका थकलाय की, बोलणंही त्याच्या जीवावर येतंय. गेला आठवडाभरात तीन डायलिसिस नं संकेत गाळठून गेलाय.
"पेपर झाले न् एक-दोन आठवड्यातच मी आजारी पडलो. मला धाप लागायला लागली. थोडं चाललो तरी थकल्यागत वाटायचं," संकेत सांगतो. संकेतच्या आईवडलांनी त्याला दवाखान्यात नेलं. निमगाव भोगीच्या आसपास दर्जेदार हॉस्पिटलं नाहीत, त्यामुळं त्यांनी ६४ कि.मी. दूर अहिल्यानगर (पूर्वीचं अहमदनगर) गाठलं. खासगी दवाखान्यात उपचार सुरू झाले. दरम्यान बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. तोवर संकेतची तब्येत आणखीच खालावलेली. त्याची दोन्ही मूत्रपिंड निकामी झालीत, असं डॉक्टरांनी सांगितलं. कॉलेज, शिक्षण दूरच आता संकेतला घराबाहेरही पडणंही मुश्कील झालं.
तरणाताठा मुलगा अंथरुणाला खिळला. असं का व्हावं? संकेतची आई सांगते, "डॉक्टरांनी सांगितलं, 'तुम्ही जे पाणी पिता त्यामुळं पोराच्या किडण्या खराब झाल्या.' आम्ही इथल्ल्या तलावाचं पाणी प्यायचो." ४७ वर्षीय मनिषाताईंच्या कपाळावर आठ्या पडतात. त्या पुढं सांगतात, "तलावाचं पाणी विषारी झालंय, हे आम्हाला उशीरा कळलं. हाताशी आलेल्या पोराची तब्येत बिघडली...तवा कळलं. "
मनिषाताई सांगतात तो पाझर तलाव, साधारण पन्नास वर्षांपूर्वी बांधण्यात आलाय. नैसर्गिक जलवाहिनीवर या तलावाचं बांधकाम झालंय. गावातील ३३० कुटुंब याच तलावाचं पाणी वापरतात. शेतीशिवाय घरगुती कामांसाठीही या पाण्याचा उपयोग होतो. गेल्या १२ ते १५ वर्षात या तलाव परिसरात कॅन्सर नि किडनीच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं आढळतंय.
"डॉक्टर लोकं सांगायचे का, दुषित पाणी जास्त दिवस पेसाल, तर किडन्या खराब व्हतील. तसंच दिसाय लागलंय, कधी नव्हते इतके किडनीचे पेशंट आता गावात दिसाय लागलेत." मनिषाताई सांगतात. या वृत्तांकनासाठीच्या पहिल्या गावभेटीतच मला पाच कुटुंबं भेटली, ज्यात किमान एकतरी डायलिसिसवर जगणारा रुग्ण होता.






















