“आता आम्हाला त्यांच्या शेतात जायची गरजच नाही. आमचं धान्य आम्ही स्वतःच पिकवतो आणि आमच्या जनावरांना लागणारा चारासुद्धा स्वतःच पिकवतो. जिथवर नजर जाते तिथवर ही जमीन आता आमचीच आहे.” असं म्हणत राजिंदर कौर आपला हात पुढे करत जवळपास १२५ एकरावर पसरलेली शेती दाखवतात. स्वातंत्र्यानंतर तब्बल ६७ वर्षांनी म्हणजे २०१४ मध्ये या गावातल्या दलितांनी ही जमीन सवर्ण जातींकडून परत मिळवलीये.
बालद कलां गावातल्या जवळजवळ प्रत्येक भूमिहीन दलित स्त्रीला सवर्ण पुरुषांनी त्यांच्या शेतात पाऊल टाकण्यावरून ‘त्यांची जागा दाखवली’ होती. त्या गावातल्या प्रत्येक स्त्रीच्या मनात अन्यायाची आपली अशी एक गोष्ट कोंडलेली आहे. अपमानाचे ते प्रसंग अजूनही त्यांच्या आठवणीत ताजे आहेत, पण त्यांनी केलेल्या संघर्षानं हे सर्व मागे सारून त्या दलित स्त्रियांनी आज एक नवा इतिहास घडवलाय.
दलित चळवळीने एकूण पंचायत जमिनीपैकी एकतृतीयांश जमिनीवर हक्क मिळवण्यासाठी जोरदार लढा दिला आणि १९६१ च्या ‘पंजाब व्हिलेज कॉमन लॅण्ड्स’ (रेग्युलेशन) कायद्यानुसार त्यांना आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढण्याचा पूर्ण अधिकार घटनेनेच दिलेला आहे. या संघर्षातून २०१४ पासून दक्षिण पंजाबमधल्या १६२ गावांमधील तब्बल २०,००० बीघे (म्हणजे सुमारे ४,२१० एकर) जमीन दलितांनी परत मिळवलीय आणि आता ते पुन्हा नव्या लढ्यासाठी सज्ज झालेत. आता हा लढा १९७२ च्या ‘जमीन धारणेच्या कमाल मर्यादा’ कायद्याचं उल्लंघन करून सवर्ण जातींकडे अतिरिक्त असलेल्या जमिनीवर दावा करण्यासाठी दिला जाणार आहे.
संगरूर आणि पटियाला दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वर असलेलं बालद कलां हे गाव या चळवळीचं निर्णायक केंद्र आहे. इथल्या राजिंदर कौरसारख्या स्त्रिया त्यांनी त्यांच्या एकजुटीच्या संघर्षानं काय काय साध्य केलंय हे आज आनंदानं, खुलेपणानं अगदी तपशीलवार सांगतात. न्याय मिळविण्यासाठीच्या लढाया बालद कलां गावाला काही नवीन नाहीत. गावाच्या सीमेवर न्याय्य जगाच्या स्वप्नांसाठी लढताना शहीद झालेल्यांची स्मारकं त्यांनी दिलेल्या प्रतिकाराच्या लढ्याची मूक साक्ष देत उभी असलेली आपल्याला दिसतात.













