ड्रायव्हरने तिला आश्वासन दिलं की तो तिला घरी सोडेल, पण कार उलट्या दिशेने धावत राहिली. जेव्हा त्याने हायवेवर पहिला यू-टर्न घेतला नाही, तेव्हा नेहाला वाटले की तो नकळत चुकला आहे. दुसरा यू-टर्न येऊन गेल्यानंतर या १५ वर्षांच्या मुलीचा संशय बळावला. तिसऱ्यांदा असं झालं तेव्हा ती घाबरली. तिचे डोळे पाणावले; ती आजारी पडली.
अस्वस्थ आणि अनिश्चित, ती तिच्या पालकांना भेटण्यासाठी ओरडली. कारमध्ये तिच्या शेजारी बसलेली महिला आणि ड्रायव्हरने तिला काळजी करू नका असे सांगून शांत करण्याचा प्रयत्न केला.
पण खोलवर, नेहाला माहित होतं की ती मोठ्या संकटात आहे. घर सोडण्याचा तिचा निर्णय आवेगपूर्ण होता आणि तिला एव्हाना त्याचा पश्चाताप होऊ लागला.
वर्षाच्या सुरुवातीला, मे २०२३ मध्ये, नेहाचं तिच्या आईवडिलांशी भांडण झालं कारण त्यांच्या मते ती अभ्यासात कमी, फोनवर जास्त वेळ घालवत होती. भांडणाच्या अखेरी नेहाचा फोन जप्त करण्यात आला.
“मम्मीपप्पांनी माझा मोबाईल जप्त केला याचा मला खूप राग आला,” ती डोळ्यांत डोळे न घालता हळू आवाजात म्हणाली. "मला फक्त त्यांना सोडून जायचं होतं.”
त्यामुळे ती सकाळी ६ च्या सुमारास घरातून निघाली आणि तिच्या शेजारच्या अरुंद रस्त्यावरून मार्ग काढत हायवेवर पोहोचली. घरच्यांवर रागावलेल्या अवस्थेत आपण खूप दूर चालत आलो ही जाणीव तिला होईपर्यंत ती हायवेच्या कडेने ७-८ किलोमीटर चालत आली होती. तोवर सूर्य उगवून काही तास झाले होते आणि तिला तहान लागली होती, पण पाण्याची बाटली विकत घेण्यासाठीही तिच्याकडे पैसे नव्हते.
तेवढ्यात एक चमकदार काळी सेडान गाडी तिच्या समोर थांबली. "एक माणूस गाडी चालवत होता आणि मागे एक बाई," नेहा आठवून सांगते. त्या महिलेने खिडकीची काच खाली केली आणि घरी परतण्यासाठी लिफ्ट हवीय का? असं नेहाला विचारलं. “ते चांगले लोक वाटत होते. मी खूप थकली असल्याने परत चालून जाणं जमणार नव्हतं आणि माझ्याकडे बसच्या तिकिटासाठी पैसेही नव्हते.”
नेहाने त्यांना हो म्हटलं. गाडीच्या एअर कंडिशनरने तिला आराम मिळाला, तिने आपलं डोकं मागे टेकवून कपाळावरचा घाम रुमालाने पुसला. त्या महिलेने तिला पाण्याची बाटली देऊ केली.
पण तो इसम तिच्या घराच्या विरुद्ध दिशेने गाडी चालवू लागला तेंव्हा तिच्या मनात भीती घर करू लागली. तिने आरडाओरडा करण्याचा, विरोध दर्शवण्याचा प्रयत्न केला, पण अखेर एक तासाभरानंतर गाडी थांबली. ते भोपाळला पोहोचले होते. नेहाचं अपहरण झालं होतं.
भारतात, २०१६ ते २०२१ दरम्यान एकूण ४,०३,८२५ मुले बेपत्ता झाली होती. मध्य प्रदेश राज्य या
आकडेवारीत सातत्याने शीर्षस्थानी आहे - या कालावधीत या राज्यात अधिकृतपणे (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार) ६०,०३१ प्रकरणं नोंदवली गेली. २०२२ मध्ये, चाइल्ड राइट्स अँड यू (क्राय) या संस्थेच्या आरटीआय विनंतीनुसार राज्यात ११,७१७ मुलं बेपत्ता झाली, अर्थात वर्षाला सरासरी १०,२५० किंवा दररोज २८ मुलं - हा आकडा भारतातील इतर कोणत्याही राज्यापेक्षा जास्त आहे.




