काही वर्षांपूर्वी अशी स्थिती होती की तुम्हाला जर ग्रामसभेत काही मांडायचं असेल, समजा गावासाठी एखादा तलाव बांधायचाय किंवा असंच इतर काही तर सरपंच किंवा अध्यक्षांसोबत बसून बोलण्यासाठी बायांना जागाच नसायची,” गोदावरी मरावी सांगतात.
२०२४ चा जुलै महिना. पाऊस सुरू होता. मध्य प्रदेशातल्या बर्गागावमध्ये बायांशी बोलत असताना लक्षात येत होतं की परस्थिती बरीच बदललीये. आणि अर्थातच या बायांच्या जिद्दीचा आणि चिकाटीचाच तो परिणाम होता.
हलचलित महिला किसान विमेन प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड या कंपनीच्या सहा सदस्या आणि गोदावरी सकाळी सकाळी आल्या होत्या. दिंडोरी जिल्ह्याच्या समनापूर तालुक्यातल्या पत्र्याच्या मोठ्याशा गोदामात सगळ्या जणी बसलेल्या होत्या. आत आल्यावर एका कोपऱ्यातलं त्यांचं हे ऑफिस. एक खुर्ची, टेबलावर एक संगणक, काही शेल्फ आणि थंड हवेसाठी एक कूलर.
आपली ओळख शेतकरी असणं ही या महिलांसाठी मोठी सन्मानाची गोष्ट आहे. आणि त्यातूनच त्यांच्या कंपनीच्या नावाचा उगम झाला. नांगर म्हणजेच हिंदीत हल चालवणं हे पूर्वापारपासून पुरुषांचं काम मानलं गेलं आहे. या धारणेलाच त्यांनी आव्हान दिलं आणि आपली ओळख नांगर चालवणाऱ्या महिला – हलचलित महिला – अशी ठासून सांगितली. आज त्यांच्या कंपनीच्या १४०० सदस्या आहेत. त्या कंपनीच्या समभागधारकही आहेत.
यातल्या दोघी, गोदावरी मरावी, वय ४४ आणि देवकी वागळे, वय ४७ बर्गा गावात राहतात. त्या घरून चालत त्यांच्या कचेरीत आल्या आहेत. बाकीच्या आपापल्या गावांहून रिक्षाने, किंवा घरच्या कुणासोबत मोटरसायकलवर मागे बसून इथे पोचल्या आहेत.
सध्या गोदावरी ताई कंपनीच्या अध्यक्ष आहेत. पूर्वी इथले शेतकरी रासायनिक खतांचा फार वापर करत नसत पण २०१० पासून शेतीमध्ये रासायनिक खतं आणि कीटकनाशकं वापरणं अगदी रुळून गेल्याचं त्या सांगतात. २०२२ पासून मात्र दिंडोरी जिल्ह्यातले बरेच शेतकरी जैविक किंवा नैसर्गिक शेतीकडे वळू लागले आहेत किंवा दोन्ही पद्धतीची शेती करत आहेत. रसायनमुक्त शेतीला प्रोत्साहन देणाऱ्या एका संस्थेकडून त्यांना आवश्यक सहाय्य आणि पाठबळ मिळत आहे.
“आम्ही शेतकऱ्यांना गावरान बी-बियाणं देतो. जेव्हा शेतातलं तण, गवत आणि धसकटासकट शेत नांगरलं जातं तेव्हा हे सगळं मातीत कुजून जातं. हेच पहिलं नैसर्गिक खत,” गोदावरी सांगतात.


