आमच्यासमोर उभ्या असलेल्या एका महिलेला आम्ही तिचं नाव विचारलं. तेव्हा तिनं तमिळमध्ये उत्तर दिलं ‘वेंडा’. ‘वेंडा’ हेच तिचं नाव आहे हे समजायला आम्हालाही काही वेळ लागला. पण तिला ते नाव सांगण्यात कोणताही संकोच वाटत नव्हता. ‘वेंडा’ हे तमिळमधील ‘वेंदम’ या शब्दाचं संक्षिप्त रुप आहे. या शब्दाचा अर्थ म्हणजे एखादी गोष्ट नकोशी असणं किंवा तिची गरज नसणं.
३९ वर्षीय एन. वेंदम ही नरसिम्मन आणि दिवंगत राजम्मल यांची मुलगी. या दाम्पत्याच्या पोटी तीन मुलं आणि दोन मुली अशी पाच अपत्य जन्माला आली. या सर्व भावंडांमध्ये वेंडा सर्वात धाकटी. अनेकवेळा गर्भधारणा झाल्यामुळे शारीरिकदृष्ट्या क्षीण झालेल्या आईच्या पोटी वेंडाचा जन्म झाला. यापुढे आपल्याला आणखी अपत्य होऊ नये अशी इच्छा मनी धरून आईवडिलांनी तिचं नाव ‘वेंडा’ असं ठेवलं. तिच्या आधार कार्डवर मात्र तिचं नाव वेंदम म्हणून लिहिलंय.
काही वर्षांपूर्वी राजम्मल हयात असताना त्यांच्याशी गप्पा झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं होतं की, “जर ही मुलगा म्हणून जन्माला आली असती तर आम्ही तिला हे नाव मुळीच दिलं नसतं.” पण पोटी मुलगी आली अन् जन्म दाखल्यावर हेच नाव कोरलं गेलं.
आपल्या मुलीला हे नाव दिल्याची खंत राजम्मलच्या मनात कायम होती. “आम्ही तुझं हे नाव ठेवलं नसतं आणि वारंवार ‘वेंडा वेंडा’ असं बोललो नसतो तर कदाचित तुझं नशीब उजळलं असतं,” असं त्या आपल्या मुलीला म्हणाल्याही होत्या.
वेंडाच्या मते, तमिळनाडूच्या तिरुवल्लूर जिल्ह्यातल्या मद्दूर या गावात, ‘वेंडा’ नाव असलेल्या कमीत कमी दहा स्त्रिया असतील. “तिरुत्तानी तालुक्यातल्या आमच्या भागातल्या कितीतरी गावांमध्ये, आमच्या समाजात हे नाव पूर्वी सर्रासपणे मुलींना दिलं जायचं,” ती पारीला सांगते.





