बोली भाषेत सांगायचं गेलं तर मराठी महिने पुढीलप्रमाणे मांडले गेले आहेत. चैत, वैशाख, जेठ, आखार, श्रावण, भादवा, आश्विन, कार्तिक, मकशीर, पूस, माई आणि शिमगा म्हणजेच फाल्गुन. त्यातला माईचा म्हणजे माघ महिना संपल्या-संपल्या फाल्गुन महिना चालू झाला की शिमगा सणाचे पडसाद उमटू लागतात.
होळी पौर्णिमेच्या दोन आठवडे आधीपासून छोट्या छोट्या होळ्या पेटवून आट्यापाट्या खेळ खेळत पूर्ण रात्र जागून काढली जाते. त्यानंतर होळीच्या दिवशी मोठी होळी पेटवून सण साजरा केला जातो. त्या वेळेस फक्त पुरुष मंडळी यामध्ये सहभागी होण्याची परंपरा आहे. होळी वेगवेगळ्या पद्धतीने रचली जाते. त्यामध्ये अखंड बांबूची काठी पानांसहित मध्यभागी उभी करून त्यावर तांदळाच्या पापड्या, एखादा फुलांचा हार, साखरेच्या गाठ्या बांधून सजवली जाते. तसंच एक काळ्या कोंबडीचं पिल्लूसुद्धा बांबूच्या वरच्या टोकाला बांधलं जातं. मग ती काठी होळीच्या मधोमध उभी करून आजूबाजूला जंगलातून आणलेली लाकडं व्यवस्थित रचून होळी उभी केली जाते.
होळी उभी राहिली की तिची पूजा करून नारळ वाढवला जातो व नारळ त्यामध्ये टाकून दर्शन घेतलं जातं. मग एक गावातील पुढारखी होळीची दवंडी गावभर देऊन होळी लावली जाते.
पूर्वी एक गाव एक होळी असल्याने गावापाड्यात एकोपा निर्माण व्हायचा. होळीच्या आधी लग्न झालेल्या नवीन जोडप्याला होळी लागल्यानंतर होळी सभोवताली पाच फेरे पूर्ण करून दर्शन घ्यावे लागते. अश्या प्रकारे होळी पेटल्यानंतर पूर्ण रात्र मजा मस्करी करत खेळ खेळले जातात. मेव्हणी-मेव्हणा असतील नणंद-भावजई असतील किंवा अनेक मित्र मैत्रिणी अशी नाती ही एकमेकांसोबत मजा मस्करी करून टिंगल टवाळी करत पूर्ण रात्र आनंदात साजरी करतात. लहान मुलं शिमग्याची सोंगं घेऊन गावा-गावात पोस्त मागण्यासाठी फिरतात. वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख परिधान करून लोकांना हसवतात. अशा पद्धतीने सण साजरा केला जातो. शिमग्याचा सण म्हणजे आनंदाची पर्वणीच म्हणावी लागेल.





