“एक झाडू तयार करण्याचे सात टप्पे असतात,” भगवती म्हणाली.
केवळ २० वर्षांच्या भगवतीला ही कला अवगत आहे. आई आणि इतर कुटुंबियांकडून ती झाडू तयार करायला शिकली. “आधी आम्ही खजूराची पानं वेगवेगळी करतो, त्यानंतर कोवळी पानं काढून टाकतो,” तिनं सांगितलं.
एका मोठ्या पिसासारख्या पानाला छोटीछोटी पानं असतात, त्यांना ती तुकडे तुकडे म्हणते. झाडू तयार करणारे ही सगळी छोटी पानं तोडून त्यांच्या छोट्या छोट्या पेंड्या बांधून ठेवतात. त्यानंतर ती एका बांबूला बांधून त्यावर पॉलिथीन घट्ट गुंडाळतात. शेवटचा टप्पा म्हणजे पानं लहान करून त्यांच्या कडा काढून टाकण्याचा असतो, असं तिनं सांगितलं. अधूनमधून तिची बहीण देवळी डोकावून जात होती.
त्या दोघी मावस बहिणींना त्यांच्या लहानपणी बघितलेली झाडू तयार करायची सगळी पद्धत आठवत होती. पंजाबमधल्या मालौत गावातल्या एका रस्त्याच्या कडेला भगवतीची आई सोनी देवी इतर बायकांसोबत गोल करून बसली होती. झाडू तयार करताना प्रत्येक टप्प्यावर आपलं काम झालं की ते पुढच्या बाईकडे सोपवताना होणारी त्यांची लयबद्ध हालचाल एका सुंदर नृत्यासारखीच होती.
आपल्या पारंपरिक कामातला उत्साह देवळीच्या बोलण्यातून जाणवत होता. “लहानपणापासूनच आम्ही खूप मन लावून झाडू तयार करायचं काम करायचो आणि आजही आम्ही हे काम मनापासून करतो,” तिनं सांगितलं. देवळी तिची आई रुख्मिणीकडून हे काम शिकली आता ती तिच्या तीन लहान बहिणींना हे काम शिकवणार आहे.
तिची मावस बहीण भगवती या कामाबाबत तिच्याइतकीच उत्साही असली तरी व्यवहारीसुद्धा आहे. “कष्ट केले तर खायला मिळेल. काम नाही केलं तर खायचं काय?” असा तिचा प्रश्न आहे. तिच्या आईकडून लहानपणापासून ती हेच ऐकत आलीय, की झाडू तयार नाही केले तर आपण खायचं काय? झाडू तयार करण्यासाठी राजस्थानमधल्या मेवाडमधून पंजाबमध्ये गेलेल्या इतर सगळ्या लोकांची हीच भावना आहे.





















