“आमच्या चेहऱ्यावर हे मुखवटे का आहेत तुम्हाला माहितीये का? खरंतर आम्ही आमच्या वेदना या मुखवट्यांमागे लपवतोय.” श्यामल मन्नाने उत्तर दिलं. तो उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावाहून मोर्चासाठी आला होता. “आम्ही संतापलोय म्हणून इथं आहोत.”
'कॉक्रोच जनता पार्टी'च्या आवाहनानंतर दिल्लीत सुरू झालेल्या आंदोलनाने आता देशभर जोर धरलाय. कोलकात्यातील या निदर्शनादरम्यान, नेहमी दिसणारे मीम्स आणि पोस्टर्ससोबतच, अनेक तरुणांनी 'आयर्नमॅन', 'सुपरमॅन' आणि वेगवेगळ्या सुपरहिरोंचे मुखवटे चेहऱ्यावर लावलेले दिसत होते.
२४ जुलै रोजी दुपारी पावणे तीनच्या सुमारास कोलकात्याच्या सियालदह स्थानकापासून मोर्चाला सुरुवात झाली आणि एस्प्लेनेड जवळ तो संपला. स्थानिक वृत्तपत्रांनुसार, या मोर्चामध्ये हजारो लोक सहभागी झाले होते. संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास, आंदोलक आणि कोलकाता पोलीस यांच्यात किरकोळ बाचाबाचीही झाली, शेवटी पोलिसांकडून पाण्याचा मारा करण्यात आला.


















