वायनाडच्या उतारांवर, हिरवाईने नटलेल्या दऱ्यांवर धुक्याची चादर पसरलेली असते आणि (लॅटराइट टेकड्यांतून (म्हणजे उष्णकटिबंधीय हवामानामुळे तयार झालेल्या लालसर रंगाच्या, विटांसारख्या कठीण खडकांच्या टेकड्या, ज्यात लोह आणि ॲल्युमिनियम ऑक्साइड्स जास्त असतात) ओहोळ झुळझुळ वाहत असतात आणि अशा परिसरात काळाच्या प्रवाहाला ताठ मानेने सामोरं जाणारं मातीचं एक भक्कम घर उभं आहे. त्या घराच्या मातीच्या भिंती उन्हाळ्यात थंडावा देत, वाऱ्याने हलकेच कुरकुरणारी बांबूची कौलं, आणि जड गुलाबी सागाच्या लाकडी तुळ्या सुमारे दीडशे पावसाळ्यांचा भार सोसूनही आज ताठपणे उभ्या आहेत. घराची जमीन लाल मातीने सारवलेली असून दर आठवड्याला शेणाने तिला मऊसूत केलं जातं.
केरळमधील मनंतवाडी शहराजवळच्या कम्मणा गावातलं हे घर म्हणजे भाताच्या बियांना त्यांच्या कहाण्या हळूच सांगण्याची हक्काची जागाच आहे.
कुर्चिया समाजाचे चेरुवायल रामन (राज्यात अनुसूचित जमात म्हणून नोंद) या बियांचे राखणदार आहेत. कधी काळी संपूर्ण मालबार भागात त्यांचा समाज भातशेतीसाठी लागणाऱ्या कौशल्यासाठी खूप प्रसिद्ध होता. आज ७३ वर्षांचे असलेल्या रामन यांनी अनेक दशके आर्थिक अडचणी, ढासळणारं आरोग्य आणि शासन व इतर संस्थांकडून होणाऱ्या सततच्या दुर्लक्षाला सामोरं जात भाताच्या पारंपरिक बिया जपून ठेवल्या आहेत.
“या बिया म्हणजे जिवंत पूर्वजच आहेत,” असं रामन ज्यांना प्रेमाने आणि आदराने रामेट्टन म्हणतात ते सांगतात. केरळच्या कृषी आत्म्याचा राखणदार म्हणूनच त्यांची सर्वदूर ओळख आहे. कारण कधीकाळी या भूमीत घराची संपन्नता म्हणजे त्या घराच्या कोठारात साठवलेल्या भाताच्या विविध जातींची संख्येवरून ठरवलं जात असे.
रामन यांनी आपली वडिलोपार्जित जमीन भात बियांच्या विविधतेच्या जिवंत संग्रहालयातच जणू रूपांतरित केली आहे. त्यांच्या धान्यकोठारात वायनाडमधील ५० पारंपरिक भातजाती आणि केरळच्या इतर भागांतून संकलित केलेल्या जवळपास १४ जाती आहेत. दर हंगामात ते या जाती पिकवतात, बिया साठवतात आणि पारंपरिक शेतीशी बांधिल असलेल्या प्रत्येकाला त्या मुक्तहस्ते देतात. मग त्यात आदिवासी शेतकरी, वैयक्तिक उत्पादक, संशोधक आणि संस्था हे सगळेच आले. “प्रत्येक भाताला एक आत्मा असतो,” ते म्हणतात. “त्या भातात त्याच्या मातीची स्मृती असते, पावसाची आठवण असते, पिढ्यान्पिढ्यांचा स्पर्श त्याने लक्षात ठेवलेला असतो. ते हरवलं, तर तुमचा इतिहासही हरवतो.”
घराच्या समोरच्या खोलीतल्या मंद प्रकाशात दुर्मिळ भातजातींनी भरलेल्या गोणपाटाच्या पिशव्या एकावर एक रचलेल्या आहेत. जणू इतिहासाचे मूक पहारेकरीच. प्रत्येक पिशवीवर मल्याळम भाषेत चेन्नेलू, थोंडी, चेंबकम, वेलियन, गंधकासला, कायमा या भाताच्या प्रकारांची नावं लिहिलेली आहेत, जी नावं आपल्याला अंगाईगीतांसारखी वाटतात.
रामन पारीला सांगतात की, वाफाळणाऱ्या गंधकासलाचा सुगंध हवेत पसरतो तेव्हा तो जाई आणि चंदनाची आठवण करून देतो; कायमा, ज्याला जीरकासला असंही म्हणतात, त्याचा लोण्यासारखा दरवळ मालबारच्या बिर्याणीची ओळखच बनलाय; तर चेंबकमची चव गोड आणि नाजूक असते. नारळाच्या दुधात शिजवलेल्या पायसममध्ये ती जणू विरघळून जाते.










