दशरथ मुसहरच्या घरापासून फक्त १०० मीटर अंतरावर एक हातपंप आहे. दिवसभर पाणी हापसल्याचा आवाज येत असतो. बाया कपडे धुताना अंघोळ करत असताना पाणी हापसतात आणि दिवसभर हातपंपाचा आवाज ऐकू येतो.
पण वोरनार गावात राज्य शासनाने बसवलेला हातपंप दशरथच्या कुटुंबाला वापरता येत नाही. मुसहर ह्या दलित समाजातील व्यक्तींना पलामू गावातील पंपावरून पाणी घेण्याची अजूनही अनुमती नाही.
“हमन के गारी देवाले, कहले ना की कही और से पानी भरो [ते शिवीगाळ करतात आणि आम्हाला दुसरीकडून पाणी आणायला सांगतात],” दशरथ मुसहर सांगतो. त्यांची भांडी फेकून दिली असल्याचंही ते सांगतात.
रामावतार चौधरीचं घर हातपंपाच्या शेजारी आहे. “हे लोक स्वच्छता राखत नाहीत म्हणून त्यांना पाणी नाकारलं जातं. ते पाणी कोण वापरेल, सांगा.” गावातल्या २,७४९ लोकसंख्येपैकी (जनगणना २०११) जवळजवळ एक तृतीयांश मुसहर दलित आहेत. त्यांच्याबाबत उघड उघड भेदभाव केला जातो त्याबद्दल विचारलं असता त्याने हे उत्तर दिलं.








