विमला मेघवाल समाजातली. राजस्थानात मेघवाल समाज अनुसूचित जातीत येतो. परंपरेने मेघवाल समाज शेती, पशुपालन आणि कपडे तसंच घोंगड्या विणण्याचं काम करत आलाय. पण शैक्षणिक प्रगती आणि एकंदर विकासाच्या बाबतीत पाह्यलं तर, शतकानुशतकांच्या जातीय भेदभावापायी हा समाज अत्यंत मागे राहिलेला दिसतो.
विमलाचा ३६ वर्षांचा नवरा कंवरलाल आणि त्याचा ३२ वर्षांचा भाऊ भोजाराम. दोघांनी शाळा अर्धवट सोडली. आपल्या धाकट्या भावंडांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून ते मिठागरात मजूर म्हणून राबायला जायचे. भूमिहीन दलित शेतकरी असलेला कंवरलाल आता भाडेतत्त्वावर घेतलेल्या ४० बिघा (इथे ४ ते ५ बिघे म्हणजे साधारण एक एकर) जमिनीवर बाजरी, गहू, मेथी आणि भुईमुगाची लागवड करतो. तुरळक आणि अनियमित पाऊस, वारंवार पडणारा दुष्काळ, पिकांचं होणारं नुकसान आणि कमी उत्पादन यामुळे फलोदी भागात शेती करणं हे एक मोठं आव्हानच आहे.
साधारण २०० मिलिमीटर सरासरी पाऊस पडणाऱ्या या शुष्क कोरड्या प्रदेशात पाणी ही किती दुर्मिळ आणि मौल्यवान गोष्ट असावी याची कल्पनाच केलेली बरी! भांड्यांना चिकटून बसलेलं खरकटं काढण्यासाठी विमला अगदी किंचितसंच पाणी वापरते. घराशेजारच्या टंक्यातून (जमिनीखालचा पाणीसाठा) ते घेतलेलं असतं.
थरच्या वाळवंटात पाण्याच्या तीव्र टंचाईशी सामना करण्यासाठी सर्वाधिक उपयोगात येतो तो टंका! बावडी आणि तलाव यांच्या तुलनेत हा तसा नवा. सेंट्रल अॅरिड झोन रिसर्च इन्स्टिट्यूटने १९८८ मध्ये प्रकाशित केलेल्या एका पुस्तिकेनुसार, या भागातला पहिला टंका १६०७ साली राजा सूरसिंग यांनी वाडी का मेलान या गावात बांधला. त्यानंतर १७५९ मध्ये जोधपूरच्या मेहरानगड किल्ल्यात महाराजा उदयसिंग यांनी एक टाकं बांधलं. पण प्रामुख्याने १८९५-९६ च्या भीषण दुष्काळात या भागात मोठ्या प्रमाणावर अशा टंक्या बांधण्यात आल्या.
“छतावर पडणारं पावसाचं पाणी साठवण्यासाठी या टाक्यांचा वापर केला जातो आणि हे असं साठवलेलं पाणी मग पिण्यासाठी वापरलं जातं. ही टाकी सिमेंट, काँक्रीट आणि दगड वापरून बनवतात. पश्चिम राजस्थानात अशा टाक्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो,” विमलाचा १९ वर्षांचा पुतण्या बद्रीनारायण चौहान सांगत असतो, “१० फूट रुंद आणि २० फूट लांब टंकीत साधारण ५६ ते ५८ हजार लिटर पाणी साठवता येतं. आणि अशी टंकी बांधायला अंदाजे ५० ते ८० हजार रुपये खर्च येतो.”
विमलाच्या घराच्या अंगणात दोन टंक्या आहेत. एक आहे जुनं- २००१ मध्ये बांधलेलं. या टाकीत पावसाचं पाणी साठवलं जातं. दुसऱ्या नव्या आणि तुलनेने मोठ्या टाकीत घरगुती वापरासाठी ६० हजार लिटरपर्यंत पाणी साठवता येतं. मोठ्या टाकीत हल्ली टँकरचं पाणी भरलं जातं. ५ हजार लिटरसाठी साधारण ५०० रुपये या दराने हे कुटुंब पाणी विकत घेतं. ‘इंदिरा गांधी कालवा’ हा भारतातला सर्वात लांब कालवा आहे. विमलासारख्या घरांपर्यंत येणाऱ्या टँकरमधे पाणी भरलं जातं ते या कालव्याजवळच्या शुद्धीकरण केंद्रातून. पंजाबमधल्या हरिके बॅरेजमधून या कालव्यात पाणी येतं. हे आहे सतलज आणि बियास नद्यांच्या संगमाचं क्षेत्र.