श्रीनगरच्या हरवान भागातील एका शांत गल्लीत मोठा आवाज येत होता. मोहम्मद अफझल आणि साजिद खान अक्रोडच्या झाडाची छाटणी करत होते आणि जवळपासच्या घरांच्या पत्र्याच्या छतावर टणक वस्तू आदळावी तसा तो आवाज घुमत होता.
शंभर फूट उंच किंवा १० मजली इमारतीच्या आकाराच्या झाडावर, अक्रोडची छाटणी करणं तसं धोकादायक काम आणि म्हणूनच अक्रोड तोडणाऱ्या पुरुषांना अत्यंत कुशल कामगार मानलं जातं ज्यांना चानन वोल (अक्रोड छाटणी करणारे) म्हणतात. जम्मूच्या राजौरी येथील रहिवासी असलेला मोहम्मद अफझल गेल्या सहा वर्षांपासून अक्रोड छाटणीचं काम करतो. दर हंगामात, बकरवाल समुदायातील (राज्यात अनुसूचित जमाती म्हणून सूचीबद्ध) हा २४ वर्षीय तरुण कामासाठी काश्मीरला जातो. “मला भीती वाटते,” तो म्हणतो, “कारण झाडं उंच आहेत.” अक्रोड वेचण्याव्यतिरिक्त, तो ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये दिवसाला ५००-७०० रुपये रोजाने सफरचंद पॅकेजिंगचं आणि झाडं तोडण्याचं काम करतो.
या काळात, त्या बागेत अक्रोड छाटणी करणारा अफझल आणि इतर लोक त्याच बागेजवळ तात्पुरते तंबू उभारून राहतात.
ऑगस्ट ते ऑक्टोबर या कापणीच्या हंगामात, अफझलचं काम सकाळी सात वाजता सुरू होतं आणि सहसा संध्याकाळी सहा वाजता संपतं. तो उंचीनुसार दिवसाला चार ते पाच झाडांची छाटणी करू शकतो, विलो किंवा इतर मजबूत लाकडापासून बनवलेला लांब, मजबूत खांब वापरून वरच्या फांद्यावर चढतो आणि अक्रोड तोडतो.
अक्रोडची छाटणी हे अवघड काम असल्याचं अफजल म्हणतो. “हे खूप धोकादायक काम आहे” तो सांगतो. पाच किलो वजनाची काठी हातात घेऊन तिच्याने जोरात अक्रोड तोडताना तुम्हाला झाडावर खूप चपळतेने तोल सांभाळावा लागतो.
अक्रोडची काही झाडं, विशेषतः बडगाममध्ये, १५० फूट उंच वाढतात. “पावसाळ्याच्या दिवसात, आम्ही झाडांवर चढणं टाळतो कारण ते खूप निसरडे होतात,” अफझल पुढे म्हणतो. “सुदैवानं, मला कधीही कोणत्याही अपघाताचा सामना करावा लागला नाही.”
पण त्याच्या कुटुंबाला त्याच्या सुरक्षिततेची चिंता सतावते. “माझ्या आईला वाटतं की मी हे काम करू नये कारण आमच्या गावात अनेक पुरुष अक्रोडच्या झाडावरून पडून दगावले आहेत,” तो कबूल करतो.














