“मी फक्त अंघोळ करण्यासाठी घरी जातो,” मिर्झा मोहम्मद खान मिश्किल स्वरात बोलतो. तो त्राग्बलमधील खान टी स्टॉलमध्ये बसलाय. श्रीनगरहून गुरेझ खोऱ्यात जाणारे बरेच पर्यटक इथे थांबतात. काश्मीरच्या या भागात वस्ती फारशी नाही. त्यामुळे स्टॉलकडे आणि त्याच्या होर्डिंगकडे लगेच वेधलं जातं.
३२ वर्षीय स्टॉल मालक मिर्झा मोहम्मद सांगतो, “आम्हाला दर चार दिवसांनी ५०० लिटर पाणी मिळतं. मला चहा बनवण्यासाठी, भांडी धुण्यासाठी आणि इतर आवश्यक गोष्टींसाठी हे पाणी पुरवून वापरावं लागतं. त्यामुळे इथे अंघोळ करून २०-३० लिटर पाणी कसं काय वाया घालवून चालेल? चहाचा प्रत्येक कप महत्त्वाचा आहे,” तो पुढे सांगतो.
त्राग्बलमध्ये, रझदान पर्वतांच्या प्रदेशात काम करणारा मिर्झा गेल्या १२ वर्षांपासून स्टॉल चालवत आहे, पर्यटकांना चहा, कॉफी, मॅगी नूडल्स आणि इतर स्नॅक्स तो तयार करून देतो. “मी बुधवार ते रविवार असे आठवड्यातून पाच दिवस इथे राहतो म्हणून मी ही जागा म्हणजे माझं दुसरं घरच आहे. आठवड्याच्या सुरुवातीचा दिवस असल्याने सोमवारी इथे खूप कमी पर्यटक येतात म्हणून मी त्या दिवशी घरी जातो,” मिर्झा सांगतो. त्याचं घर उत्तर काश्मीरमधील बांदीपोर जिल्ह्यातल्या पेठकूट भागात आहे, इथून ३० किलोमीटर अंतरावर. त्राग्बलमध्ये असताना, मिर्झा स्टॉलमध्येच झोपतो. इथे एक स्टोअर रूम आणि ३ बाय ६ फूट बेडरूम आहे.








