अरबी समुद्र पुन्हा जमिनीच्या दिशेने पुढे सरकतोय आणि पालघर जिल्ह्यातल्या डहाणू खाडीतले वाळुचे उंचवटे व उथळ प्रवाह आपल्या कवेत घेतोय. अमिता ताई तांडेल यांची पुरेशी झोपही होत नाही. त्या भरती येण्याची वाट पाहतात आणि बऱ्याचदा त्यासाठी गजर लावून ठेवतात. बॅटरीवर चालणारा हेडलाइट कपाळावर लावून आणि खांद्यांवर १०-१५ किलो वजनाचं जाळं टाकून, त्या मध्यरात्रीनंतर अंधारात चालत जातात. खाडीच्या दिशेनं जवळपास ४०० मीटर अंतरावर एक बाई त्यांची वाट पाहत असते. त्या म्हणतात, “अनेक वर्षांच्या अनुभवानंच आम्हाला चंद्राच्या कला ओळखायला शिकवलंय. या कलाच आम्हाला भरती आणि ओहोटीच्या वेळा सांगतात.”
“आमच्या समाजात मुलं त्यांच्या आई-वडिलांना मासेमारी करताना बघतच मोठी होतात. मी १५ वर्षांची असल्यापासून माझे वडील मला त्यांच्यासोबत घेऊन जायचे. भरती-ओहोटी, चंद्र आणि खाडीत मासा फिरण्याच्या जागा या सगळ्याबद्दल त्यांनीच मला शिकवलं.” अमिता ताई आता वयाच्या साठीत आहेत. आयुष्यातली पाच दशकं त्यांनी त्यांच्या वडिलांसारखीच भरती-ओहोटीचे अंदाज घेण्यात घालवलीत.
खाडीच्या काठावर पोहोचल्यावर, त्या आणि त्यांच्या सोबत असलेली बाई अशा दोघीही १०० बाय २० फुटांचं जाळं मोकळं करतात आणि पसरवतात. लगेचच त्या जाळ्याची दोन्ही टोकं हातात धरून समुद्रात उतरतात, एकमेकींपासून साधारण ३० फुटांच्या अंतरावर चालत त्या जाळं पाण्यात बुडवून ओढत नेतात आणि त्यात काय घावलंय का हे डोळ्यांनी पाहण्यापेक्षा अंदाज घेऊनच ओळखतात.
“रात्री पायाखाली काय आहे हे दिसत नाही. आमच्या कपाळाला बॅटरी असते. फक्त लाईटच्या सिग्नलवर चालते. इथं प्रचंड मोठ्या लाटा असतात आणि फक्त एका चुकीमुळे तुमचा तोल जाऊ शकतो. इथं कधीच सुरक्षितता नसते. कधी कधी आमच्या गळ्यापर्यंत पाणी असतं. आम्ही काम करत राहतो, कारण जर मासे न पकडताच आम्ही परतलो तर त्यादिवशी आमच्याकडे पैसे नसतात.” अमिता ताई चार तासांहून जास्त काळ पाण्यात असतात, पुरेसं दिलासादायक वजन त्यांच्या हाती पडत नाही तोपर्यंत.
ज्यांच्याकडे होडी नाही अशा त्यांच्यासारख्या बाया आणि पुरुष हाताने मासेमारी करायला साधारण २० किलोमीटर लांबीच्या खाडीत जातात. ही खाडी डहाणू तालुक्यातल्या वरोर गावापासून अवघ्या काही मीटर अंतरावरच आहे. हा भाग भरती-ओहोटीच्या पट्ट्यातला आहे. ओहोटीच्या वेळी हा भाग उघडा पडतो आणि समुद्राचं पाणी परत आलं की तो पाण्याखाली जातो. “मी जर समुद्रात गेले नाही, तर आम्ही काय खाणार?” असा प्रश्न अमिता ताई विचारतात.




















