तब्बल साडेपाच दशकं संगत राम यांच्या आयुष्यात जीवन आणि मृत्यूमधलं अंतर फक्त एका केसा एवढंच होतं. ते अंगठ्याच्या आणि तर्जनीच्या नखांनी हलकेच आपल्याला दर्शवून म्हणतात, “इतकंसं जरी संतुलन ढासळलं म्हणजे अगदी केसाएवढंसुद्धा तरीही माणूस बुडण्याची भीती आहे.” बियास नदीच्या बर्फासारख्या थंड, भयंकर धोकादायक पाण्यातून मार्ग काढणं हे काही काही येऱ्यागबाळ्याचं काम नव्हे, विशेषतः शतकानुशतकं नदी ओलांडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या, सतत डुगडुगणाऱ्या, फुगवलेल्या बैलाच्या कातड्यावरून तर अजिबातच नव्हे.
८९ वर्षांचे संगत राम हे हिमाचल प्रदेशातील कुल्लू खोऱ्यातील जिवंत असणाऱ्या अखेरच्या तारू चालवणाऱ्यांपैकी एक आहेत. त्यांचा व्यवसाय फार पूर्वीच संपुष्टात आलाय. या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा ठिकठिकाणी पूल आणि 'झुले' (म्हणजे हाताने ओढायची दोरीवरची ट्रॉली) उभे राहिले, तेव्हापासून या विशिष्ट कसब असणाऱ्या कामाचं महत्त्व झपाट्यानं कमी झालंय. त्याआधी मात्र, स्थानिक देवतांपासून राजांपर्यंत, वरातीतल्या माणसांपासून मृतदेहांपर्यंत, आणि पिकांपासून लाकडाच्या ओंडक्यांपर्यंत अक्षरशः आकाशाखालचं जवळजवळ सर्व ते आपल्या 'दिरिया' वरून नदीपलीकडे नेत असत.
'दिरिया' म्हणजे बियास नदी ओलांडण्यासाठी वापरलं जाणारं फुगवलेलं बैलाचं कातडं. दिरिया बद्दलच्या आख्यायिका जवळजवळ दोन हजार वर्षांपूर्वीच्या आहेत, जेव्हा अलेक्झांडरच्या सैन्याने भारतात पुढे जाण्याविरुद्ध बंड केले होते तेव्हापासून. अगदी लोककथांमध्ये सुद्धा तेव्हाचे स्थानिक लोक दिरियावरून नदी पार करत असल्याचे उल्लेख आहेत. परंतु ग्रीक लोकांना मात्र ही भयंकर मोठी नदी पार करणं अशक्य वाटत होतं. बियास नदी ही अलेक्झांडरसमोर उभी राहिलेल्या सर्वांत कठीण अडथळ्यांपैकी एक होती. काही इतिहासकारांचं तर असं मत आहे की भारतातील त्याच्या मोहिमेची पूर्वेकडची अंतिम मर्यादा हीच नदी ठरली.
शतकानुशतकं, संगत राम यांच्या पूर्वजांसह असंख्य तारूंनी चालवलेल्या या दिरियाच बियास नदीच्या डाव्या आणि उजव्या तीरांना जोडणारा एकमेव पूल होत्या. बियास नदी उंचावरील 'बियास कुंड' या हिमनदीय सरोवरातून उगम पावते आणि तब्बल ४७० किलोमीटर प्रवास करून पंजाबच्या सपाट प्रदेशातील हरिके इथे जाऊन सतलज नदीला मिळते.










