“जर आम्ही गुदोक नाहीये किंवा संपलाय असं सांगिलं, तर आमचे बरेच ग्राहक आमच्या हॉटेलमध्ये जेवतच नाहीत” असं चंदन चकमा सांगतो. गेल्या आठ वर्षांपासून ३७ वर्षीय चंदन आणि त्याची ३६ वर्षीय पत्नी शमारू आपल्या हॉटेलमध्ये गुदोक बनवतात आणि आवडीने खाऊ घालतात. आंबवलेले मासे आणि भाज्यांपासून तयार होणारा गुदोक हा त्रिपुरातील उनाकोटी जिल्ह्यातील चकमा समुदायाचा पारंपरिक पदार्थ आहे.
हे दाम्पत्य त्यांच्या शांतीनगर गावात जेसिका हॉटेल चालवतं. त्यांचं लग्न होऊन आता वीस वर्षे झालीत. जेसिका आणि शेवॉन या त्यांच्या दोन मुली अनुक्रमे बारावी अन् आठवीत शिकतात.
“गुदोक ही आमच्या ओळखीचा मुख्य भाग आहे” असे चंदन सांगतात. त्रिपुरा राज्यातील चकमा समुदाय अनुसूचित जमातींमध्ये समाविष्ट आहे, आणि अलीकडील जनगणनेनुसार या समुदायाची लोकसंख्या सुमारे ८०,००० आहे.
गुदोक हा त्यांच्या हॉटेलमधला वर्षभर सर्वाधिक खाल्ला जाणारा पदार्थ आहे, असं या दाम्पत्याचं म्हणणं आहे. तीन खोल्यांच्या जेसिका हॉटेलमध्ये एकावेळी सुमारे ४० लोक जेवू शकतात आणि इथल्या थाळीची किंमत १०० ते १६० रुपये इतकी आहे. पारंपरिक गुदोक हा या थाळ्यांमधील सर्वाधिक लोकप्रिय पदार्थांपैकी एक आहे.
“लोक आम्हाला अनेकदा गुदोक फक्त थाळीत नव्हे तर वेगळा विकायला सांगतात, जेणेकरून ते तो घरी घेऊन जाऊ शकतील” असं चंदन सांगतो. चंदन घरच्या जेवणासाठी गुदोक बनवतो. तो पुढे सांगतो, “इथं राहणाऱ्या सर्व समुदायातल्या लोकांना हा पदार्थ आवडतो — हलाम, मोग, देबबर्मा यांसारख्या जमातींसह, बांगलादेशमधून अनेक वर्षांपूर्वी स्थलांतर केलेले शांतीनगरमधील बंगाली भाषिक रहिवासीही त्यात आहेत.”
सर्वांच्या आवडीचा गुदोक हा भाज्या आणि आंबवलेल्या माशांपासून बनवला जातो. स्थानिक या आंबवलेल्या माशाला बेरमा किंवा शिडोल असं म्हणतात. यासाठी पुंती आणि फायस्सा या माशांच्या प्रजातींचा वापर केला जातो. “आम्ही फायस्सा शिडोल वापरतो कारण त्याला एक वेगळी झणझणीत चव असते” असं चंदन सांगतात. ते स्थानिक बाजारातून शिडोल प्रति किलो सुमारे ५०० रुपये या दराने खरेदी करतात.










