छायाचित्रांच्या माध्यमातून गेल्या सात वर्षांपासून मी स्वच्छता कामगारांचं जगणं आणि त्यांचा संघर्ष टिपत आलोय. व्यवस्थित मास्क किंवा इतर कुठलंही सुरक्षासाधन घालून स्वच्छता कामगार काम करतायत असं या काळात मला दिसलेलं नाही; अगदी एकदासुद्धा! एखाद दुसरं साधन जर वापरलंच, तर तेही त्यांनी स्वतःचं स्वत: तयार केलेलं असतं.
भारताने विज्ञानाच्या क्षेत्रात आभाळभरारी घेतली असली तरी आजही आपण हाडामांसाच्या माणसांना गटारात उतरायला लावतो- त्यात ते स्वत:चा जीव धोक्यात घालतात आणि अनेकदा तर जीवच गमावून बसतात. विज्ञानाने प्रगती केली असली तरी समाजमनात अजूनही जातीभेद खोलवर आणि घट्ट रुतून बसल्याचंच हे द्योतक!
कोविड महामारी किंवा नैसर्गिक आपत्ती अशा काही खास परिस्थितीतच स्वच्छता कामगारांना समाज ‘फ्रंटलाइन वर्कर’ वगैरे संबोधतो. बाकीच्या वेळी ते असतात फक्त आणि फक्त कचरा उचलणारे!
चेन्नईची रिपॉन बिल्डिंग म्हणजे ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशनची मुख्य इमारत. या बिल्डिंगसमोर १ ते १३ ऑगस्ट २०२५ दरम्यान स्वच्छता कामगारांनी स्वच्छतेच्या कामाचं खासगीकरण थांबवण्यासाठी धरणं आंदोलन केलं. तेराव्या दिवशी तामिळनाडू सरकारने पोलिसांच्या मदतीने आंदोलकांना तिथून जबरदस्तीने हटवलं.
ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशनने झोन ५ (रायपुरम) आणि झोन ६ (थिरु व्ही का नगर) या भागातलं घनकचरा व्यवस्थापन खासगी कंत्राटदारांकडे सोपवायचं ठरवलंय. या निर्णयाच्या विरोधात या भागातल्या स्वच्छता कामगारांनी १ ऑगस्टपासून आंदोलन छेडलं होतं.
या कामगारांमध्ये बहुसंख्येने आहेत दलित महिला; आणि त्यांनी वर्षानुवर्षं अक्षरश: खपून शहरांच्या साफसफाईचं काम केलंय. त्यांच्यासाठी खासगीकरण हा फक्त मजुरीचा नाही तर जगण्याचा नि प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. कॉर्पोरेशनची थेट नोकरी हातची जाणं म्हणजे सध्याच्या कामगार कायद्यांनुसार पक्क्या नोकरीची शक्यता गमावणं. हा विरोध म्हणजे एका अर्थाने त्यांची पोटासाठीची लढाई; आणि त्यांच्या अदृश्य श्रमाची किंमत कार्यक्षमतेच्या नावाखाली आणखी कमी होऊ न देण्यासाठीचा निर्धार!


























