“फार वाईट वाटायचं आधी मला; पण आता मी पूर्णपणे निराशही झालोय आणि हताशही!’’ धीरेंद्र सिंह सांगत असतात. हे कजरीचे वडील. यांचं वय ५६ वर्षं. लखनौमधल्या एका खाजगी महाविद्यालयात ते सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. लखनौमधे ते भाड्याच्या घरात राहतात. त्यांची बायको व कजरी यांच्यासह त्यांच्या दोन मुली उत्तर प्रदेशामधल्या हरदोई जिल्ह्यातल्या त्यांच्या स्वतःच्या घरात राहतात.
“साधारण १५ वर्षं झाली; मी लखनौमधल्या वेगवेगळ्या कंपन्या, महाविद्यालयं अशा ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करतोय. २०२१ सालापासून मात्र एकाच ठिकाणी नोकरी टिकणं कठीण झालंय. कजरीला घेऊन जावं लागतं त्यांना वारंवार- पोलिसांकडे जबाब देण्यासाठी, वेगवेगळ्या चाचण्यांसाठी! आणि त्यासाठी सारख्या रजा घ्याव्या लागतात. मग मला कामावरून काढून टाकलं जातं. पुन्हा नवीन नोकरी शोधावी लागते,’’ धीरेंद्र सांगतात.
दर महिन्याला साधारण ९,००० रुपये त्यांच्या खिशात पडतात. आपल्या कुटुंबाला पोसायचं तर इतकेसे पैसे कसे पुरायचे? “काही म्हणजे काहीच घडत नाहीये. मग या अशा परिस्थितीत कजरीच्या सुरक्षेचा धोका पत्करून, तुटपुंज्या कमाईतले पैसे प्रवासावर खर्च करून पुन्हा पुन्हा मी तिला लखनौला कसं आणू?’’
कजरी सापडल्याला साडेतीन वर्षं उलटून गेलीयेत. न्याय मिळवण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांना फारसं यश आलेलं नाही. विधी साहाय्य कार्यालय, मोहनलालगंज पोलीस ठाणं आणि लखनौमधील कैसरबाग जिल्हा न्यायालयात त्यांनी अनेकदा खेटे घातलेत. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १६४ नुसार कजरीचा जबाब काही अजून दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवला गेलेला नाही. न्यायालयाला २०२० सालचा पोलिसांचा एफआयआर हवा आहे, हहे त्यामागचं कारण! २०२० साली कजरीची सुटका झाली होती,’’ धीरेंद्र सिंह मुद्दा उलगडून सांगतात.
धीरेंद्र यांनी दाखल केलेला एकमेव एफआयआर आहे तो २०१० सालच्या डिसेंबरचा! कजरी बेपत्ता झाल्यानंतर दोन दिवसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३६३ आणि ३६४ अंतर्गत अपहरणाच्या आरोपाखाली तो एफआयआर दाखल करण्यात आला होता. आता फाटलेलं, अस्पष्ट असं ते हस्तलिखित! १४ वर्षांनंतर आता त्यावर लिहिलेलं फारसं काही वाचता येत नाही. पोलिसांकडे या २०१०च्या एफआयआरची कोणतीही प्रत नाही - डिजिटल किंवा प्रत्यक्ष कागदावरची! आणि त्यांच्या मते, २०२० मध्ये कजरीच्या सुटकेनंतर समोर आलेल्या तथ्यांसह पुढील एफआयआर दाखल करण्यासाठी ती प्रत आवश्यक आहे.
याचा आणखी एक अर्थ असा की, न्यायालयाला आवश्यक असलेला ‘२०२०चा एफआयआर’ अस्तित्वातच नाही. त्यामुळे कजरीचा खटला न्यायाच्या दरबारी अजून दाखलच झालेला नाही.