माझ्या माणसांचं मरणं, त्यांच्या मृत्यूकथा लिहायला मी बसलो की, दरवेळी मनात एक पोकळी घर करते. असं वाटतं, माझंच शरीर एक प्रेत झालंय, या प्रेतातून श्वासांचं उत्क्रमण होतंय.
अवतीभोवतीचं जग किती आधुनिक झालंय, पण आपला समाज? तो सफाई कामगारांचं जीवन कवडीमोलच मानतो. सरकारही बिनदिक्कतपणे सफाई कामगारांचं मरण नाकारतांना दिसतं. या वर्षी लोकसभेत विचारल्या गेलेल्या एका प्रश्नावर सामाजिक न्याय मंत्रालयाचे मंत्री रामदास आठवलेंनी आकडेवारी दिलीय, त्यानुसार - '२०१९ ते २०२३ दरम्यान भुयारी गटारं साफ करताना केवळ ३७७ जण मेलेत.'
या सरकारी आकड्यांत गफलत वाटते. कारण गेल्या सात वर्षात मी स्वत: अनेक सफाई कामगारांच्या मृत्यूंचा साक्षीदार राहिलोय. एकट्या चेन्नई जिल्ह्यातील आवडी या उपनगरातच २०२२ या एकाच वर्षात बारा सफाई कामगार मेलेत. यावरून अंदाज बांधता येईल, सफाई कामगारांचे मृत्यू शासकीय नोंदीपेक्षा खूपच जास्त निघतील.
११ ऑगस्ट. अरूंदतियार समाजातला, अवघ्या २५ वर्षाचा तरूण हरी मेला. हरी नाला सफाई करणारा एक कंत्राटी कामगार होता.
त्याच्या मृत्यूनंतर बारा दिवसांनी ही घटना नोंदवण्यासाठी मी अवदीला पोचलो. तोपर्यंत हरीचं प्रेत त्याच्या घरातच बर्फाच्या पेटीत ठेवलेलं. हरीची बायको तमिल सेल्वी. शेजाऱ्यांनी तिला हरीच्या अंत्यसंस्कारांसाठी तयार केलं. एका विधवेकडून अपेक्षित असतं ते करायला ती सज्ज झाली. त्यांनी तिला हळदीनं माखलं. मग आंघोळ घालून तिचं मंगळसूत्र तोडलं. या कर्मकांडाची ती केवळ धीरगंभीर मूक साक्षीदार होती.




















